विविधा : आनंद यादव

कथा, कविता, कादंबरी, ललितगद्य, समीक्षा इत्यादी साहित्यप्रकार हाताळणारे लेखक आनंद यादव यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यात कागल येथे 30 नोव्हेंबर 1935 रोजी शेतमजूर कुटुंबात झाला. त्यांचे पूर्वज पूर्वी जकात गोळा करीत असत त्यामुळे त्यांना जकाते हे नाव मिळालेले होते; पण यादव हे त्यांचे मूळ आडनाव. त्यांचे वडील रत्नाप्पा यांची स्वतःच्या मालकीची शेती नव्हती.
एका जमीनदाराच्या शेतावर ते कूळ म्हणून सहकुटंब शेतीकाम करीत असत. घरात शिक्षणाची कोणतीच ओळख नव्हती. वडिलांचा शिक्षणाला पूर्ण विरोध होता. मात्र आईच्या प्रोत्साहनामुळेच ते शिकले. त्यासाठी अनेक हालअपेष्टा सोसत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. पुढे प्राध्यापक झाले तसेच नामवंत लेखकही झाले. अनेक ठिकाणी नोकरी केल्यानंतर पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागप्रमुख पदावरून निवृत्त झाले.
वर्ष 1975 नंतर त्यांनी सुरू केलेल्या ग्रामीण साहित्य चळवळीमुळे मराठी साहित्यात नवा यादवकाळ सुरू झाला आहे, असा उल्लेख गं. ना. जोगळेकर यांनी केला होता. यादव यांनी अनेक वेगवेगळे वाङ्मयप्रकार हाताळले, तसेच वेगवेगळे अनुभव मांडले. मात्र, ते ग्रामीण भागातून आले असल्याने ग्रामीण जीवन हाच त्यांच्या साहित्याचा मुख्य विषय राहिला. त्यांच्या लेखनात सृजनशीलता आणि चिकित्सकपणा या दोन्ही बाजू एकवटल्या असल्याचा अनुभव येतो.
आपल्या लेखनाची सुरुवात त्यांनी काव्यलेखनाने केली. वर्ष 1960 मध्ये ‘हिरवे जग’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. त्यानंतर ते कथाकार म्हणून वाचकांना माहीत झाले. त्यांचा ‘खळाळ’ हा कथासंग्रह वाचकांच्या पसंतीस उतरला. ग्रामीण माणसांच्या अंतर्मनाचा ठाव घेणार्या कथा खळाळचे वैशिष्ट्य आहे. ‘आदिताल’मधील त्यांच्या कथेने मानवी मनातील आदिम कामभावनांचा वेध घेतला आहे. या कथेचे स्वरूप यादवांच्या एकूणच कथात्मक साहित्यात खूपच वेगळे ठरले. ‘डवरणी’ मध्ये यादवांच्या कथेचे नवे स्वरूप दिसून येते. त्यानंतर या कथेचे विकसितरूप झाडवाटा, भूमिकन्या आणि उगवती मने या कथासंग्रहातून दिसून येते.
जीवनानुभव कथेऐवजी कादंबरीसारख्या विस्तृत वाङ्मयप्रकारातून अधिक चांगला होईल असे लक्षात आल्यावर त्यांनी कादंबरीलेखन केले. त्यांच्या ‘गोतावळा’ या कादंबरीत एका कोल्हापुरी शेतगडी तरुणाचे कोल्हापुरी बोली भाषेत अभिव्यक्त झालेले आत्मप्रकटीकरण आहे. या कादंबरीने आपले वैशिष्टपूर्ण स्थान निर्माण केले. ग्रामीण तमाशा कलावंताच्या उपेक्षित जीवनाचे वास्तव दाखवणारी ‘नटरंग’ ही कादंबरीही समाजजीवनाचा आरसा आहे. या कादंबरीवरील ‘नटरंग’ हा चित्रपटही तुफान लोकप्रिय झाला.
त्यांच्या झोंबी, नांगरणी, घरभिंती आणि काचवेल या कादंबर्यांच्या रूपाने यादवांनी कादंबरीचा नवा मानदंड निर्माण केला. त्यांचे 10 कथासंग्रह, 11 कादंबर्या, 3 कवितासंग्रह आणि सुमारे 15 अन्य साहित्य प्रकारातील पुस्तके आहेत. त्यांच्या साहित्याची कन्नड, तेलगु, हिंदी, इंग्रजी, जर्मन इत्यादी भाषांमध्ये भाषांतरे झाली आहेत. त्यांना शिवाजी सावंत पुरस्कार, पु. ल. देशपांडे स्मृती पुरस्कार, आचार्य अत्रे पुरस्कार, लाभसेटवार पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले. त्यांच्या ‘झोंबी’ या आत्मचरित्रात्मक कादंबरीला 1990 मध्ये साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. पुणे येथे 27 नोव्हेंबर 2016 रोजी त्यांचे निधन झाले.





