विविधा : सरफोजी महाराज….

कलाप्रेमी, साहित्यप्रेमी तसेच तंजावरच्या मराठा रियासतीमधील भोसले घराण्याचे शेवटचे शासक सरफोजीराजे भोसले यांचा आज जन्मदिन. छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजीराजे यांचे सरफोजीराजे हे वंशज. सरफोजी हे बहुआयामी व्यक्तिमत्त्व. त्यांचा जन्म भोसल्यांचे मूळ पुरुष मालोजीराजे यांचा भाऊ विठोजी यांचे वंशात 24 सप्टेंबर 1777 रोजी झाला. ते दहा वर्षांचे असताना तंजावरचे राजे तुळजाजी यांनी 23 जानेवारी 1787 रोजी सर्व धार्मिक विधी करून त्यांना आपला दत्तक मुलगा म्हणून स्वीकारले व ते सरफोजीराजे दुसरे म्हणून ओळखले जाऊ लागले.
सरफोजीराजेंना उत्तम शिक्षण मिळावे म्हणून रेव्ह. फ्रेडरिक श्वार्ट्स या डॅनिश मिशनरीची नेमणूक करण्यात आली. श्वार्ट्स यांनी राजपुत्रास उचित असे शिक्षण देऊन इंग्रजी, फ्रेंच, जर्मन, लॅटिन इत्यादी पाश्चात्य तसेच मराठी, तेलुगू, हिंदी, उर्दू इत्यादी भारतीय भाषा शिकविल्या. तुळजाजींच्या निधनानंतर अमरसिंह नावाच्या सावत्र भावाने सर्व सत्ता बळकावली. तेव्हा सरफोजी मातोश्रीसह चेन्नई येथे आश्रयाला गेले. सरफोजींचे दत्तकविधान अवैध आहे आणि मीच या गादीचा खरा वारस आहे, असे अमरसिंह यांनी केलेल्या दाव्याने तत्कालीन मद्रास प्रांताचे गव्हर्नर सर आर्चिबॉल्ड कँबेल यांनी विशेष चौकशी न करता अमरसिंहाला 10 एप्रिल 1787 रोजी मान्यता दिली.
10 वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर सरफोजींचे गुरू श्वार्ट्स यांनी पुन्हा दत्तक-प्रकरण धसास लावून ईस्ट इंडिया कंपनीला असे दाखवून दिले, की सरफोजी हेच खरे वारस आहेत.तेव्हा कंपनीने अमरसिंहाला पदच्युत करून सरफोजींचा वर्ष 1798 मध्ये राज्याभिषेक केला. त्यानंतर पुढील वर्षीच लॉर्ड वेलस्ली या गव्हर्नर जनरलने अर्काटबरोबरच तंजावर संस्थान खालसा केले. त्या वेळी सरफोजींच्या ताब्यात खासगी मालमत्ता, तंजावरचा किल्ला आणि भोवतालचा काही भाग देण्यात आला आणि सालिना साडेतीन लाख रुपये तनखा मंजूर करण्यात आला. राजा हा किताब नाममात्र राहिला. अशा परिस्थितीत त्यांनी तंजावरच्या सांस्कृतिक विकासाकडे आपले लक्ष केंद्रित केले.
सरस्वती महाल लायब्ररीची स्थापना तंजावरच्या राजांनी (1535-1675) पॅलेस लायब्ररी म्हणून केली होती. सरफोजींनी ती नकाशे, शब्दकोश, नाणी आणि कलाकृतींनी समृद्ध केली. विद्वानांकडून संस्कृत ग्रंथ, काव्ये, नाटके, टीका वगैरे लिहून घेतल्या तसेच प्राचीन ताम्रपट, ताडपत्रे, भूर्जपत्रे इत्यादींचा मोठा संग्रह केला. बर्नेल नावाच्या विद्वानाने सरफोजींच्या संग्रहातील ग्रंथांची बृहत्सूची तयार केली. सरफोजींनी ग्रंथ संपदेचे सोळा विभाग करून प्रत्येक विभागावर एक प्रमुख नेमला. ते स्वतः कवी होते आणि भरतनाट्यम् व संगीतकलेला उत्तेजन दिले. भारतीय वैद्यकशास्त्राच्या अभ्यासाची सोय केली.
चित्रकला, बागकाम, नाणे-संकलन, मार्शल आर्ट्स, शिकार आणि बैलझुंज या गोष्टींचाही त्यांना छंद होता. राजमहालातील दिवाणखाना उत्कृष्ट भित्तिचित्रांनी सुशोभित केला. सेतुभवसत्रम् व पुदुकोट्टई येथे चुनाविटांचे दोन स्तंभ उभारण्यास प्रारंभ केला. छापखाना सुरू करून देवनागरी लिपीतील खिळे तयार करवून घेतले. पवनचक्की, विद्युतयंत्र, राजमहालात उघडलेली वेधशाळा अशा विविध कृतींद्वारे त्यांची संशोधक दृष्टी दिसून येते. तंजावर चित्रशैली त्यांनी विकसित आणि लोकप्रिय केली. सुमारे आपल्या 40 वर्षांच्या कारकिर्दीनंतर 7 मार्च 1832 रोजी त्यांचे निधन झाले.





