दखल : पर्यावरण अनुकूल जीवनशैली?

पर्यावरणाचा र्हास थांबवण्यासाठी पर्यावरणाला पूरक जीवनशैली स्वीकारणे गरजेचे आहे. आपली जीवनशैली बदलणे मात्र तेवढे सोपे नाही. तरीही दैनंदिन जीवनात अगदी साध्या सोप्या गोष्टी अंमलात आणणे सर्वांना सहज शक्य आहे.
पर्यावरणाचा र्हास आणि हवामानातील बदल या जागतिक घटना आहे. ज्याचा परिणाम हा मानवाबरोबरच प्राणी, पशू-पक्षी या सगळ्यांवर होत असतो. ज्यामध्ये जगाच्या एका भागातील होणार्या कार्यामुळे जगभरातील परिसंस्था (इकोसिस्टम्स) आणि लोकसंख्येवर परिणाम होतो. यासाठी केवळ वैयक्तिक आणि सामुदायिक वागणुकीत बदल करून देखील पर्यावरण आणि हवामानाच्या संकटांमध्ये एक महत्त्वपूर्ण फरक घडवू शकतो. यासाठी आवश्यक आहे पर्यावरणासाठी आवश्यक असलेल्या जीवनशैलीचा अंगीकार करण्याची, याविषयीचा घेतलेला आढावा.
पर्यावरणाचा र्हास आणि हवामान बदल समस्या आपल्यासमोर येऊन ठाकल्या आहेत. याला प्राथमिक दोषी मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्रियाकलापांना मानले जाते. त्याचप्रमाणे मनुष्यप्राण्यांची दैनंदिन जीवनशैलीदेखील या समस्येला अनावधानाने का होईना कारणीभूत ठरत आहे. आपले वातावरण आपल्या जीवनशैलीवर, आपल्या निर्णय प्रक्रियेवर आणि आपल्या सभोवतालच्या जगाशी संवाद साधण्याच्या पद्धतीवर सतत प्रभाव करत असते. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आपल्याला आरामदायक वाटेल अशा गुणांसह वातावरण शोधण्याचा प्रत्येकाचा कल असतो. सांस्कृतिक पार्श्वभूमी, राजकीय विचार, आर्थिक स्थिती आणि इतर वातावरणाच्या आंतर सांस्कृतिक समज यासह जीवनातील अनेक पैलूंवर आरामाची ही पातळी प्रभावित होते. जीवनशैली सामान्यतः एखाद्या व्यक्तीची वृत्ती, जीवन पद्धतीचे मूल्ये आणि जागतिक दृष्टिकोन प्रतिबिंबित करते.
बदलत्या पर्यावरणाविरोधात आवश्यक ती कार्यवाही न झाल्यास जागतिक स्तरावर अंदाजे 3 अब्ज लोकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 2050 पर्यंत जागतिक अर्थव्यवस्थेचा जीडीपी सुमारे 18 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. गेल्या दोन दशकांत पर्यावरणाचा होणारा र्हास आणि हवामान बदल या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी जागतिक स्तरावर अनेक व्यापक उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. यामध्ये धोरणात्मक सुधारणा, आर्थिक प्रोत्साहन आणि नियमांचा समावेश आहे. हे सर्व उपाय प्रचंड कार्यक्षम असूनही, वैयक्तिक, सामुदायिक आणि संस्था स्तरावर आवश्यक कार्यांकडे पुरेसे लक्ष दिले गेलेले नाही. नुकत्याच जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात भारत 2070 पर्यंत ‘नेट झिरो’ गाठेल असा उद्देश ठेवला आहे. यासाठीची ‘एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य’ ही घोषणा छान आहे; पण त्यासाठी भगवान महावीरांपासून ते तथागत गौतम बुद्धांपर्यंतचा जो तत्त्वविचार आहे तो अंमलात आणणे आवश्यक आहे. तरच भारत आणि जगाला या गर्तेतून बाहेर पडता येईल.
लाइफ म्हणजे पर्यावरणासाठी जीवनशैली. प्रत्येक माणसाचे वैयक्तिक व सामूहिक कर्तव्य सुसंगत ठेवावी व त्याला हानी पोहोचू नये याची दक्षता घ्यावी. अशा जीवनशैलीचा सराव करणार्यांना लाइफ अंतर्गत प्रो प्लॅनेट पीपल म्हणून ओळखले जाते. केवळ वैयक्तिक आणि सामुदायिक वागणुकीत बदल करून देखील पर्यावरण आणि हवामानाच्या संकटांमध्ये एक महत्त्वपूर्ण फरक घडवू शकतो. संयुक्त राष्ट्रांच्या पर्यावरण कार्यक्रमानुसार (णछएझ) आठ अब्ज लोकसंख्येपैकी एक अब्ज लोकांनी जरी आपल्या दैनंदिन जीवनात पर्यावरणपूरक वागणूक स्वीकारली तरी जागतिक कार्बन उत्सर्जनात अंदाजे 20 टक्क्यांनी घट होऊ शकते.
आज पर्यावरणाचा र्हास थांबवण्यासाठी पर्यावरणाला पूरक जीवनशैली स्वीकारणे गरजेचे आहे. आपली जीवनशैली बदलणे मात्र तेवढे सोपे नाही. आपल्या सवयी आपल्या दैनंदिन जीवनात इतक्या खोलवर रुजलेल्या असतात आणि आपल्या पर्यावरणाच्या अनेक घटकांद्वारे सतत दृढ होत असतात, की पर्यावरणासाठी चांगले करण्याचा हेतू कृतीत आणणे नेहमीच सोपे नसते. तथापि, ते अशक्य पण नाही. एका वेळी एक कृती करून आणि दररोज एक बदल करून, आपण आपली जीवनशैली बदलू शकतो आणि दीर्घकालीन पर्यावरणास अनुकूल सवयी लावू शकतो.
साध्या सोप्या गोष्टींचा सराव
दैनंदिन जीवनात अगदी साध्या सोप्या गोष्टी अमलात आणणे सर्वांना सहज शक्य आहे. जसे, डिजिटल वापर कमी करणे, पाण्याचे संवर्धन करणे, वनस्पती आधारित आहाराचा अवलंबन करणे, प्लॅस्टिकचा वापर कमी करण्यासाठी भाजी, किराणामाल व इतर आवश्यकतांसाठी सुती किंवा तागाच्या पिशव्या बाजारात घेऊन जाणे, नैसर्गिक प्रकाशाला प्राधान्य देऊन, आवश्यकतेनुसार एलईडी लाइटिंग किंवा सीएफएल बल्बचा वापर करणे, वारंवार नवीन फर्निचर विकत घेण्याऐवजी नूतनीकरण, पुनर्निर्मिती किंवा सेकंड हॅन्ड फर्निचर खरेदी करणे, किमान पॅकेजिंग आणि नैसर्गिक घटकांना प्राधान्य देणारे टिकाऊ आणि पर्यावरणपूरक ब्रँड शोधून त्यांचा वापर करणे, काही वापरानंतर कपड्यांची विल्हेवाट लावण्याऐवजी ते गरजू व्यक्तींना देणे आणि कुटुंबीयांसोबत कपड्यांची अदलाबदल करण्याचा विचार करणे, जुन्या कपड्यांचे नवीन निर्मितीमध्ये रूपांतर करणे, कपडे घेताना अधिक टिकाऊ व शाश्वत फॅशनला प्रोत्साहन देणे, अगदी आवश्यक असल्यास हवाई प्रवास करणे अन्यथा रेल्वे किंवा बस सारख्या वाहतुकीच्या पर्यायी पद्धतीचा विचार करणे, लँड फील विसर्जनात योगदान कमी करणे इत्यादी अनेक बाबी दैनंदिन जीवनात अमलात जाणीवपूर्वक आणल्यास आपल्या ग्रहासाठी आपण एक शाश्वत भविष्य निर्माण करू शकतो.
आज भारताचे दरडोई उत्सर्जन जागतिक सरासरीपेक्षा कमी आहे परंतु ‘हे विश्वची माझे घर’ हे मानून, समस्त जगाला विनाशाकडे नेणार्या हवामानातील बदल थांबवण्यासाठी रोजच्या सवयींमध्ये लहानसे बदल, मनुष्याला पर्यावरणदृष्ट्या जागृत बनवू शकते व त्याने मोठे परिवर्तन आणणे सहज शक्य आहे. समाजाभिमुखता, नियमन, नियंत्रण, स्वायत्तता व परस्परावलंबन आणि पर्यावरणीय जीवनशैली हाच समतामूलक शाश्वत उपाय आहे. गरज आहे ती इकॉलॉजिकल सिव्हिलायजेशन विकसित करण्याची. आज जो धोका आहे तोच मोकादेखील आहे, पर्यावणाचे रक्षण आणि संवर्धन करण्याचा. पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन करण्यासाठी ‘विचारहीन आणि विनाशकारी उपभोग करण्याऐवजी लक्षपूर्वक व जाणीवपूर्वक उपयोग’ करणे काळाची गरज आहे.





