भाजपचा पर्दाफाश करण्यासाठी महात्मा गांधींचा मार्ग अवलंबावा लागेल – मुख्यमंत्री गेहलोत

जयपुर – सध्या भाजप कडून चुकीचे आणि असत्यपणाचे तंत्र अवलंबत जे राजकारण सुरू आहे त्यावर सत्याचा विजय नक्की होणार आम्ही या खोटेपणाच्या विरोधात गांधींच्या मार्गानेच वाटचाल करीत राहू असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी यांनी म्हटले आहे.
चार राज्यांतील विधानसभा निवडणूक निकालावर पहिलीच प्रतिक्रीया देताना ते बोलत होते. ते म्हणाले की भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाच्या नावाने धार्मिक धृवीकरण करून मतदारांवर प्रभाव टाकण्यात यशस्वी होतो. त्याच तंत्रांनी त्यांनी या निवडणुका जिंकल्या आहेत. समाजातील ध्रुवीकरणासाठी भाजप नेते हुशारीने बोलत असल्याने विरोधी पक्ष मागे पडत असल्याचा दावाही गेहलोत यांनी केला.पण शेवटी विजय सत्याचाच होतो असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
भाजप व मोदींच्या प्रचारातून विरोधकांची बदनामी केली जात आहे. आणि ही बदनामीची विधाने पंतप्रधानांच्याच तोंडून येत असल्याने लोक त्यांच्यावर विश्वास ठेवतात. या पार्श्वभूमीवर आम्हाला सत्य सामान्य लोकांपर्यंत पोहोचवावे लागेल, भाजपला उघडे पाडावे लागेल त्यासाठी आम्हाला महात्मा गांधींच्याच मार्गाने जाऊन सत्याला विजय मिळवून द्यावा लागेल, असे ते म्हणाले.
केंद्रीय एजन्सींनी देशभरात टाकलेल्या छाप्यांचे उदाहरण देत गहलोत म्हणाले की,देशात कोणाच्या इशाऱ्यावर हे छापे टाकले जात आहेत याची साऱ्या जगाला कल्पना आहे. आयटी, ईडी, सीबीआयकडून होणाऱ्या कारवाया कोणत्या उद्दीष्ठांसाठी होत आहेत याचीही जगाला कल्पना आहे असेही त्यांनी नमूद केले.





