Rajya Sabha Election 2026 : राज्यसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. १६ मार्च २०२६ रोजी राज्यसभेच्या १० राज्यांतील ३७ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार असून, मतमोजणी त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता सुरु होईल. एप्रिल २०२६ मध्ये सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. त्यानुसार १० राज्यांमधील ३७ जागा रिक्त होत आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ५ मार्च आहे. एकीकडे महाराष्ट्रात महाविकास आघाडीत एका जागेवरून संघर्ष सुरू असताना तिकडे तृणमूल काँग्रेसने शुक्रवारी संध्याकाळी राज्यसभा निवडणुकीसाठी चार उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. टीएमसीने एक्सवर पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये “आम्ही या उमेदवारांना मनापासून अभिनंदन आणि शुभेच्छा देतो. ते तृणमूलच्या सामर्थ्याचा वारसा आणि प्रत्येक भारतीयाच्या हक्कांचे आणि सन्मानाचे रक्षण करण्याच्या तिच्या दृढ वचनबद्धतेला कायम ठेवतील, ” असे म्हटले आहे. यामध्ये मंत्री बाबुल सुप्रियो, बंगालचे माजी डीजीपी राजीव कुमार, ज्येष्ठ वकील मेनका गुरुस्वामी आणि अभिनेत्री कोयल मल्लिक यांच्या नावांचा समावेश आहे. पश्चिम बंगालमधून 2026 मध्ये राज्यसभेच्या पाच जागा रिक्त होत आहेत. यापैकी चार जागा टीएमसीकडे होत्या. 294 सदस्यांच्या विधानसभेत टीएमसीकडे मजबूत संख्याबळ आहे. त्यामुळे पाचपैकी चार राज्यसभा जागा त्यांच्याकडे येतील. तर भाजपला एक जागा मिळण्याची अपेक्षा आहे. TMC च्या उमेदवारांबद्दल जाणून घेऊयात… (Rajya Sabha Election 2026) 1 बाबुल सुप्रियो : मोदी सरकारमध्ये माजी केंद्रीय मंत्री होते. केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर काढल्यानंतर त्यांनी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी दिली. सप्टेंबर 2021 मध्ये त्यांनी टीएमसीमध्ये पक्ष प्रवेश केला. टीएमसीच्या तिकिटावर बल्लीगंज विधानसभा पोटनिवडणूकीत ते विजयी झाले. ममता सरकारमध्ये मंत्री आहेत. 2 राजीव कुमार : माजी पोलिस अधिकारी आहेत. त्यांनी पश्चिम बंगालचे पोलीस महासंचालक म्हणून काम केले आहे. 3 मेनका गुरुस्वामी : सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ वकील आहेत. कलम 377 रद्द करून भारतात समलैंगिकतेला गुन्हेगारीच्या श्रेणीतून बाहेर काढणाऱ्या ऐतिहासिक संवैधानिक आव्हानात याचिकाकर्त्यांचे प्रतिनिधित्व केले होते. 4 कोएल मलिक : मल्लिक बंगाली चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहेत आणि ज्येष्ठ अभिनेते रणजीत मल्लिक यांच्या कन्या आहेत. निवडणुकीचे वेळापत्रक (Rajya Sabha Election 2026) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख : ५ मार्च २०२६ उमेदवारी छाननी : ६ मार्च अर्ज मागे घेण्याची मुदत : ९ मार्च हेही वाचा : Holi Special Recipe: होळी स्पेशल! मखमलीसारखे नरम दहीवडे घरच्या घरी कसे बनवायचे? जाणून घ्या सोपी रेसिपी