कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची विहिरीत उडी मारून आत्महत्या

हिंगोली: सततच्या नापिकीमुळे आणि कर्जाच्या ओझ्याला कंटाळून सेनगाव तालुक्यातील बाभूळगाव येथील शेतकरी बाजीराव खंडेराव वडकुते (वय 72) यांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना 30 जुलै 2025 रोजी सकाळी घडली. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.
बाभूळगाव येथील बाजीराव वडकुते यांच्या मालकीची सर्व्हे क्रमांक 420 मध्ये 1 हेक्टर 5 आर जमीन आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून सततच्या नैसर्गिक संकटांमुळे त्यांच्या शेतीला नापिकीचा सामना करावा लागला. यामुळे लागवड खर्चही वसूल होऊ शकला नाही. 2020 मध्ये स्टेट बँक ऑफ इंडियाकडून घेतलेले 1 लाख 90 हजार रुपयांचे कर्ज डोक्यावर होते. कर्जाची परतफेड कशी करावी, या विवंचनेत ते सतत अस्वस्थ होते.
30 जुलै रोजी सकाळी बाजीराव शेताकडे गेले, परंतु घरी परत न आल्याने कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी शोधाशोध केली. शेतातील विहिरीत त्यांचा मृतदेह आढळला. घटनेची माहिती मिळताच गोरेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक विनोद झळके आणि त्यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. बाजीराव यांचे बंधू गंगाधर वडकुते यांनी दिलेल्या माहितीवरून गोरेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जमादार मंचक ढाकरे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
या घटनेने शेतकऱ्यांच्या कर्जबाजारीपणाचा आणि नापिकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गावकऱ्यांनी या दुर्दैवी प्रसंगाबद्दल तीव्र दुख: व्यक्त केले आहे.





