Pune Navle Bridge accident incident : पुण्यातील नवले पुलावर अपघातांचे सत्र काही केल्या थांबायचे नाव घेत नाही आहे, गेल्या काही वर्षात अनेक मोठे अपघात या ठिकाणी झाले आहे. अनेकांनी आपले जीव येथे झालेल्या अपघातात गमावलेले आहेत. कालची संध्याकाळ भीषण अपघाताची ठरली. नवले पुलावरील विचित्र अपघातात आठ जणांना आपले प्राण गमवावे लागले. तर २० पेक्षा अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातातील मृतदेहांची ओळख पटली असून त्यांची नावे देखील समोर आली आहेत. धायरीतील दाभाडे कुटूंब हे काल नारायणपूर येथे देवदर्शनासाठी गेले होते. मात्र परतताना घरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर असताना कुटुंबावर काळाने झडप घातली आणि काही क्षणातच व्होत्याच नव्हतं झाले आणि कुटुंब भीषण अपघाताचे बळी ठरले. स्वाती नवलकर (वय ३७ ) त्यांची आई शांता दाभाडे आणि वडील दत्तात्रय दाभाडे या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर मयत तीन वर्षाची मुलगी ही स्वाती नवलकर यांच्या मैत्रिणीची मुलगी होती. धनंजय कोळी हा चालक होता. या सर्वांचा मृत्यू भीषण अपघातात झाला आहे. इतर मृतांमध्ये एक कंटेनर ड्रायव्हर आणि हेल्पर यांचा समावेश आहे. रुस्तम खान ट्रस्ट चालक आणि मुस्ताक हनीफ खान हेल्पर अशी अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांची नावे आहेत. हे दोघेही राजस्थान येथील रहिवासी होते. ‘त्या’ तरुणाची ओळख पटविण्याचे काम सुरू अपघातात रोहित कदम या २५ वर्षांच्या तरुणाचाही मृत्यू झाला असून त्याची ओळख पटविण्याचे काम पोलिस करत आहेत. रोहित ट्रक मध्ये ना कारमध्येही नव्हता मात्र त्याचा मृत्यू कसा झाला हे मात्र कळू शकले नाही. अपघातात जे जखमी २० जण आहेत. ते साताऱ्याहून मयतीवरून परत येत होते. हे सगळे घरातलेच चुलते नातेवाईक आणि शेजारीच राहणारे होते. जे त्या टेम्पो ट्रॅव्हलमध्ये होते. मृतांवर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. या अपघात प्रकरणी सिंहगड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, ते पुढील तपास करत आहेत. मात्र, नवले पुलावर होणारे अपघात चिंतेची बाब असल्याने प्रशासन काय करणार हे पाहावे लागेल. पुण्याचे खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज १४ नोव्हेंबर नवले पुल येथे अपघाताच्या ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली. हेही वाचा : लालू प्रसाद यादवांचे दोन्ही पुत्र पिछाडीवर; तेजस्वी यादव १२०० मतांनी पिछाडीवर