प्रभात वृत्तसेवा हिंजवडी – हिंजवडी व आसपासच्या परिसरात अवजड वाहने कर्दनकाळ ठरत आहेत. सोमवारी एका डंपरच्या चाकाखाली आल्याने आणखी एका तरुणीचा मृत्यू झाला. ही घटना पुनावळे येथील कोलते पाटील लाइफ रिपब्लिक हाऊसिंग सोसायटीच्या प्रवेशद्वाराजवळ दुपारी दीडच्या सुमारास घडली. वडिलांसमोर मुलीच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तन्वी सिद्धेश्वर साखरे (२०,रा. हिंजवडी) असे अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. इंटेरिअर डिझाइनचा कोर्स करणारी ही महाविद्यालयीन विद्यार्थिनी तन्वी वडील सिद्धेश्वर साखरे यांच्या दुचाकीवरून चिंचवड येथून क्लासवरून घरी परत येत होती. पुनावळे येथे वडिलांचे एक काम आटपून ते दोघे जांबे मार्गे घरी परतत होते. यावेळी वाटेत चेंबर चुकविताना सिद्धेश्वर यांची दुचाकी घसरली . या अपघातात तन्वी डंपरच्या मागील चाकीखाली पडल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर तिचे वडील दुसऱ्या बाजूला पडल्याने तेही किरकोळ जखमी झाले आहेत. परंतु त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. तन्वी तिच्या वडिलांच्या मागे दुचाकीवर बसली होती.त्यामुळे त्यांच्या डोळ्यासमोरच तिचा तडफडून मृत्यू झाल्याचे पाहून ते चाकाखाली गेलेल्या मुलीला पाहून हताशपणे पाहत होते. डोळ्यासमोर मुलीचा तडफडून प्राण जात असताना त्यांनी जोरात हंबरडा फोडला. या हृदयद्रावक घटनेमुळे हिंजवडी परिसरात हळहळ व्यक्त होत असून अवजड वाहनांचे आणखी किती बळी जाण्याची प्रशासन वाट पाहत आहे असा सवाल स्थानिक ग्रामस्थांनी उपस्थित केला.प्रभातशी बोलताना, हिंजवडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बालाजी पांढरे यांनी सांगितले की, हा अपघात दुपारी १.३० च्या सुमारास झाला. जड वाहनांना सकाळी ८ ते दुपारी १२ आणि संध्याकाळी ४ ते रात्री ९ पर्यंत आयुक्तालयाच्या हद्दीत ये जा करण्यास बंदी आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पळून गेला. त्याच्यावर कलम १०६ निष्काळजीपणामुळे मृत्यूचा गुन्हा दाखल केला जाईल.आम्ही त्याच्या शोधात पथके पाठवली असून या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहोत.