Tilak Sledging Vaibhav : सिराजची धुलाई केल्याने संतापला तिलक वर्मा! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीला लागला डिवचू, VIDEO होतोय व्हायरल
Tilak Sledging Vaibhav : दुलीप ट्रॉफीच्या फायनल सामन्यात तिलक वर्मा वैभव सूर्यवंशीसा स्लेजिंग करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Tilak Varma Fun Sledging Vaibhav Suryavanshi Stump Mic Duleep Trophy Final 2026 : एम. ए. चिदंबरम (चेपॉक) स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या दुलीप ट्रॉफी २०२६ च्या अंतिम फेरीत १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या (Vaibhav Suryavanshi) वादळी फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. ईस्ट झोनचा उपकर्णधार असलेल्या वैभवने साऊथ झोनच्या गोलंदाजांवर, विशेषतः अनुभवी मोहम्मद सिराजवर तुफानी हल्ला चढवला. या दरम्यान साऊथ झोनचा कर्णधार तिलक वर्मा (Tilak Varma) आणि वैभव यांच्यात मैदानावर घडलेला एक अत्यंत मजेशीर प्रसंग स्टम्प माईकमध्ये कैद झाला असून सध्या तो चर्चेचा विषय ठरला आहे.
“काय यार हा व्हाईस कॅप्टन…”; भर मैदानात स्टम्प माईकमध्ये कैद झाली मस्करी –
अंतिम सामन्यात साऊथ झोनचा कर्णधार तिलक वर्मा सुरुवातीपासून बचावात्मक क्षेत्ररक्षण लावताना दिसला. सीमारेषेवर क्षेत्ररक्षक पसरवल्याचा फायदा घेत वैभवने चतुराईने एकेरी-दुहेरी धावा काढत चौकार-षटकार खेचले. वैभवची ही आक्रमक आणि निर्भय खेळी पाहून तिलक वर्मा हसत हसत त्याच्या जवळ गेला आणि मिश्कीलपणे म्हणाला, “क्या यार ये वाइस कप्तान…” या दोन युवा भारतीय खेळाडूंमधील ही खट्याळ स्लेजिंग अत्यंत मैत्रिपूर्ण वातावरणात झाली. तिलकचे हे शब्द ऐकून १५ वर्षांचा वैभवही मैदानावर मनसोक्त हसताना दिसला.
Tilak Verma vs Vaibhav Suryavanshi. pic.twitter.com/YIDfgF0qps
— Ishan’s Fan (@Ishanworld32) September 6, 2026
सिराजला गोलंदाजीतून हटवले; १०० धावांची शतकी सलामी!
आगामी अफगाणिस्तान टी-२० मालिकेचा भाग असलेल्या वैभवने सिराजच्या एकाच षटकात दोन चौकार आणि गगनचुंबी षटकारासह १४ धावा कुटल्या होत्या. वैभवच्या या आक्रमक पवित्र्यामुळे साऊथ झोनला सिराजला थेट गोलंदाजीतून बाजूला करावे लागले. वैभव आणि अनुभवी अभिमन्यू ईश्वरन जोडीने पहिल्या विकेटसाठी १०० धावांची वादळी भागीदारी केली. मात्र, अर्धशतकाजवळ पोहोचताच मोठा फटका मारण्याच्या नादात वैभव चामा मिलिंदच्या गोलंदाजीवर ३७ चेंडूंत ४४ धावा करून बाद झाला.
अभिमन्यू ईश्वरनने झळकावले संयमी अर्धशतक –
दुसऱ्या बाजूने बंगालच्या अनुभवी अभिमन्यू ईश्वरनने संयमी खेळी करत वैभवच्या आधी आपले अर्धशतक झळकावले. या सामन्यात ईस्ट झोनचा कर्णधार इशान किशनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. ईस्ट झोनने आपल्या संघात एक बदल केला, तर साऊथ झोनने भारतीय संघातून परतलेले मोहम्मद सिराज आणि देवदत्त पडिक्कल यांच्यासह चार मोठे बदल केले होते.





