IND vs ENG: तिलक वर्माने T20I मध्ये रचला इतिहास, मोडला विराट कोहलीचा ‘हा’ मोठा विक्रम

Tilak Verma New Record: इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात विजय मिळवत भारतीय संघाने मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या सामन्यात भारताकडून तिलक वर्माने 72 धावांची नाबाद वादळी खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. यासोबतच तिलक वर्माच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. सलग नाबाद राहत सर्वाधिक धावसंख्या करण्याचा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला आहे.
मागील 4 सामन्यात नाबाद राहत 300 पेक्षा अधिक धावा करणारा तिलक हा पहिलाच खेळाडू ठरला आहे. यासोबतच, त्याने विराट कोहलीचा देखील विक्रम मोडला. तिलक सलग 4 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये नाबाद राहिला आहे. त्याने 4 सामन्यात नाबाद राहत 318 धावा केल्या. त्याने मागील तीन सामन्यात 107*, 120* आणि 19 धावांची नाबाद खेळी केली. तसेच, इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात 72 धावांची नाबाद खेळी करण्याची कामगिरी केली.
तिलकच्या आधी भारताकडून सलग 4 सामन्यांमध्ये नाबाद राहत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम विराट कोहली (258 धावा), संजू सॅमसन (257 धावा), रोहित शर्मा (253) आणि शिखर धवन (252) यांच्या नावावर होता. तसेच, 4 सामन्यात 271 धावा करण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या मार्क चॅपमनच्या नावावर होता. हे विक्रम मोडत आता तिलकने नवीन विक्रमाला गवसणी घातली आहे.
दरम्यान, त्याआधी इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यात भारताने टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडने 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावत 165 धावा केल्या. इंग्लंडकडून बटलरने 45 आणि ब्रायडन कार्सने 31 धावांची खेळी केली. तर भारताकडून अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्तीने प्रत्येकी 2 विकेट्स, अभिषेक शर्मा, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर आणि अर्शदीप सिंग यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.
धावांचा पाटलाग करताना भारतीय संघाने 2 विकेट्स राखून विजय मिळवला. भारताकडून तिलकने 55 बॉलमध्ये 72 धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला. तसेच, वॉशिंग्टन सुंदरने 26 धावा केल्या. इंग्लंडकडून ब्रायडन कार्सने 3 विकेट्स घेतल्या.





