भंडाऱ्यात रेल्वेच्या धडकेत वाघीण जखमी

नागपूर : जंगलालगतचे महामार्ग, रेल्वे महामार्ग वन्यप्राण्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहेत. तीन महिन्यांपूर्वी बल्लारशा-गोंदिया रेल्वे मार्गावर रेल्वेच्या धडकेत वाघिणीचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असतानाच शुक्रवारी पहाटेच्या सुमारास भंडारा वनखात्यांतर्गत रेल्वेच्या धडकेने वाघीण गंभीर जखमी झाली. या धडकेत वाघीणीची शेपटी तुटली तर पायाला देखील गंभीर मार लागला. त्यामुळे या वाघीणीच्या नशिबी कायमचे अपंगत्व येण्याची शक्यता आहे.
भंडारा वनविभागांतर्गत नाकाडोंगरी वनक्षेत्रात पवनार खारी परिसरात ही घटना घडली. विशेष म्हणजे याच परिसरात काळ्या बिबट्याचा देखील वावर आहे. तुमसर ते तिरोडी जाणारा या रेल्वे मार्गावर शुक्रवारी सकाळी हा अपघात घडला. या अपघातात वाघीणीची शेपटी कटली, तर पायाला देखील गंभीर मार लागला. त्यामुळे वाघीणीला जागेवरून उठता येणेही अशक्य होते. गंभीर मार बसल्यामुळे वाघीण वेदनेने विव्हळत होती.
या घटनेची माहिती कळताच भंडारा वनविभागाची चमू तसेच मानद वन्यजीव रक्षक शाहीद खान तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. या वाघीणीला बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले. उपचारासाठी नागपूर येथे आणण्याची शक्यता आहे. चंद्रपूर, गोंदिया, भंडारा या जिल्ह्यात रेल्वेचे जाळे मोठ्या प्रमाणात विस्तारलेले आहे. अनेक रेल्वे मार्ग जंगलाला लागून तर काही जंगलाच्या हद्दीतून गेले आहेत. मात्र, त्यानंतरही याठिकाणी वन्यप्राण्यांचे रेल्वेने होणारे अपघाती मृत्यू टाळण्यासाठी शमन उपाय गांभीर्याने घेतले जात नाही.
रेल्वेची गती या मार्गावर कमी होत नाही. वाघ, बिबट मृत्युमुखी पडले तर लक्षात तरी येते, पण कित्येक लहानमोठे वन्यप्राणी या रेलवे मार्गावर अपघाताला बळी जात आहेत. त्यानंतरही अलीकडच्या काही वर्षांत जंगलाला समांतर असणाऱ्या या रेशीय प्रकल्पांना मान्यता देण्याचे प्रमाण वाढले आहे.





