Tiger Woods Arrest : धक्कादायक! दिग्गज खेळाडूच्या भरधाव लँड रोव्हरची ट्रकला जोरदार धडक; अपघातानंतर पोलिसांनी केली अटक
Tiger Woods Arrest : २७ मार्च रोजी फ्लोरिडा येथील ज्युपिटर आयलंडवर ही घटना घडली असून, वूड्सला पोलिसांनी अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली वाहन चालवल्याच्या आरोपाखाली बेड्या ठोकल्या आहेत.

Tiger Woods Arrested after Florida Accident : जागतिक गोल्फचा बादशहा मानल्या जाणाऱ्या टायगर वूड्सच्या कारकीर्दीला पुन्हा एकदा वादाचे ग्रहण लागले आहे. २७ मार्च रोजी फ्लोरिडा येथील ज्युपिटर आयलंडमध्ये वूड्सच्या आलिशान लँड रोव्हर कारचा भीषण अपघात झाला. या अपघातातून टायगर वूड्स थोडक्यात बचावला असला तरी, अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली (DUI) गाडी चालवल्याच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली आहे.
नेमकं काय घडलं?
मार्टिन काउंटीचे शेरीफ जॉन बुडेन्सीक यांनी दिलेल्या माहितीनुसार, टायगर वूड्स आपल्या कारने प्रचंड वेगाने जात होता. एका ‘प्रेशर क्लिनर ट्रकला’ ओव्हरटेक करण्याच्या नादात त्याची कार ट्रकच्या ट्रॉलीला धडकली आणि रस्त्यावर उलटली. सुदैवाने, वूड्सने गाडीच्या पॅसेंजर साईडच्या दरवाजातून बाहेर पडत स्वतःची सुटका केली. या अपघातात वूड्स किंवा ट्रक चालकाला कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही.
#TigerWoods slams into truck & flips over in his Range Rover pic.twitter.com/QOdoUhvylx
— Mahalaxmi Ramanathan (@MahalaxmiRaman) March 28, 2026
चाचणी देण्यास नकार आणि अटक –
🚨 BREAKING #News: #TigerWoods has been arrested for #DUI after his rollover crash in #Florida pic.twitter.com/4tW8LxiADb
— Lori * VIP Influencer Group * Top Brand Creators (@TravelFoodiesTV) March 27, 2026
अपघातानंतर टायगर वूड्स अत्यंत सुस्त अवस्थेत होता. पोलिसांनी त्याची ‘ब्रेथलायझर’ टेस्ट केली असता त्यात अल्कोहोलचे प्रमाण आढळले नाही. मात्र, तो अंमली पदार्थांच्या किंवा औषधांच्या प्रभावाखाली असल्याचा पोलिसांना संशय आहे. वूड्सने लघवीची चाचणी देण्यास स्पष्ट नकार दिल्याने पोलिसांचा संशय बळावला. परिणामी, त्याच्यावर सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान आणि कायदेशीर चाचणी देण्यास नकार दिल्याबद्दल विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले.
८ तास जेलची हवा –
फ्लोरिडाच्या कडक कायद्यानुसार, अशा प्रकरणातील आरोपीला किमान ८ तास कोठडीत राहावे लागते. त्यानुसार, टायगर वूड्सला मार्टिन काउंटी जेलमध्ये ठेवण्यात आले होते. या घटनेमुळे वूड्सच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला असून, त्याच्या प्रतिमेला पुन्हा एकदा तडा गेला आहे.


