नववीतील मुलाचे थरारक कृत्य, रागात आईलाच संपवले…

अकोला – जिल्ह्यातील दहीगाव गावंडे शेतशिवारात आठवडाभरापूर्वी एका 40 वर्षीय विधवा महिलेचा अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. या महिलेच्या डोक्यावर अन् अंगावर ठिकठिकाणी दगडाने मारल्याच्या जखमा होत्या.
अखेर या हत्या प्रकरणाचा अकोला पोलिसांनी उलगडा केला. या महिलेच्या हत्येमागे तिच्याच पोटच्या 15 वर्षीय मुलाचा हात असल्याचे समोर आले आहे. या हत्या प्रकरणाच्या तपासात खळबळजनक माहिती समोर आली आहे.
पोलिसांनुसार, “मुलाची आई त्याला अनेकदा ओरडायची, त्याच्यावर रागवायची. 4 जूनला दोघांमध्ये बाचाबाची झाली. वाद वाढल्यामुळे संतापाच्या भरात आईचा कट रचला अन् तिचा दगडाने ठेचून खून केला.
संगीता राजू रवाळे (वय 40 वर्ष रा. ब्राम्हणवाडा जि. वाशीम ह.मु. दहीगाव गावंडे, अकोला) असे या मृत महिलेचे नाव आहे. गेल्या तीन चार वर्षांपासून माहेरी म्हणजेच दहीगाव गावंडे मृत संगिता राहत होत्या. रविवार म्हणजे 4 जूनपासून संगिता या गावातून बेपत्ता होत्या.
दरम्यान, गेल्या आठवड्यात मंगळवारी (6 जून) सायंकाळी दहीगाव गावंडे येथील शेतशिवारात एका खड्ड्यात त्यांच्या मृतदेह हा अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आला.
बोरगाव पोलीस ठाण्यात या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर या हत्येचा तपास अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने हाती घेतला. ज्यात संगिता यांच्या मुलानेच त्यांची हत्या केल्याचे निष्पन्न झाले.





