Satara : पुसेगावात शनिवारी कुस्त्यांचा थरार

पुसेगाव : श्री सेवागिरी महाराजांच्या ७७ व्या पुण्यस्मरणानिमित्त तसेच नारायणगिरी महाराज यांच्या ७१ व्या पुण्यतिथीनिमित्त शनिवार, दि. २८ रोजी दुपारी एक वाजता निकाली कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन केले आहे. या आखाड्यात कुस्त्यांचा थरार आणि पंजाब विरुद्ध महाराष्ट्राची लढत पाहण्याचा लाभ शौकिनांनी घ्यावा, असे आवाहन देवस्थानचे मठाधिपती सुंदरगिरी महाराज, चेअरमन डॉ. सुरेश जाधव यांनी केले आहे.
यामध्ये प्रथम क्रमांकाच्या पंजाबच्या मछावाडा आखाड्याचा हिंदकेसरी पैलवान भूपिंदर आजनाळा आणि पुण्याच्या मामासाहेब मोहोळ कुस्ती केंद्राचा उपमहाराष्ट्र केसरी पैलवान माउली कोकाटे यांच्यात काट्याची झुंज होणार आहे तर हरियाणाच्या कॅप्टन जोरासिंग आखाड्याचा हिंद केसरी भारत केसरी असलेला सेना दलाचा पैलवान दिनेश गुलिया विरुद्ध आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्र पुण्याचा पै. दादा शेळके यांच्यात लढत होणार आहे.
पंजाबच्या होशियारपूरचा पैलवान छोटा सुदामा विरुद्ध आंतरराष्ट्रीय कुस्ती केंद्र पुण्याचा पैलवान रविराज चव्हाण यांच्यात तिसऱ्या किताबासाठी झुंज होणार आहे. आखाड्यातील विजेत्या मल्लास चांदीची गदा, रोख रक्कम व ‘श्री सेवागिरी केसरी’चा किताब देण्यात येणार असल्याची माहिती विश्वस्त रणधीर जाधव, बाळासाहेब ऊर्फ संतोष जाधव, संतोष वाघ, सचिन देशमुख, गौरव जाधव व विजय जाधव यांच्यासह कुस्ती कमिटीचे सदस्य यांनी दिली.
पै. गणेश कुंकुले विरुद्ध सुदर्शन कोतकर, कोल्हापूरच्या पै. कालीचरण सोळणकर विरुद्ध आर्मी सेंटरचा पै. अमितकुमार, अकलूजचा पै. सतपाल सोनटक्के विरुद्ध करमाळ्याचा पै. समीर शेख, पुण्याच्या पै. प्रसाद सस्ते विरुद्ध पै. अनिकेत मांगडे, आंबेघरचा हभप पै. जानराज महाराज विरुद्ध जळगावचा पै. प्रणव निकम तसेच बुधचा पै. शंभू ठोंबरे विरुद्ध पै. हर्षवर्धन सावंत यांच्यात झुंज होणार आहे.
शंभर रुपयांपासून एक हजार रुपये बक्षिसापर्यंतच्या पैलवानांनी जोड्या सकाळी ९ ते ११ यावेळेत कुस्ती आखाड्यात नोंद कराव्यात. या आखाड्यात अव्वल दर्जाचे मल्ल सहभागी होणार असून, अतिशय तगड्या कुस्त्या जोडण्यात आल्या आहेत. आखाड्यात असलेल्या मातीचे जेसीबी, रोटरच्या माध्यमातून रोलिंग करून मल्लांना कुस्ती खेळण्यासाठी मैदानात सुट्टी माती करण्यात आली आहे. मैदानाच्या बाजूला देवस्थान ट्रस्टच्यावतीने प्रेक्षकांना कुस्त्यांचा आस्वाद घेण्यासाठी प्रशस्त गॅलरी उभारण्यात येणार आहे.





