पुण्यातील व्यसनमुक्ती केंद्रात थरार; काचेने गळा चिरून सहकाऱ्याची हत्या

पुणे – नऱ्हे येथील व्यसनमुक्ती केंद्रात गुरुवारी पहाटे एकाने त्याच्या सहकाऱ्याचा काचेने गळा चिरुण खून केला. तो गळा कापत असताना इतर सहकारी जागे झाले, मात्र रक्ताचे पाट वाहताना बघुन सर्व जागेवरच स्तब्ध झाले होते. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. संकेत सुनील आल्हाट (वय 24, रा. नर्हे) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. तर अरुण मोहन राठी (वय 65) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, हे व्यसनमुक्ती केंद्र नर्हे येथील एका निवासी इमारतीत आहे. तेथे वेगवेगळ्या सदनिकांमध्ये सुमारे 45 व्यक्ती उपचार घेत आहे. यातील एका सदनिकेत उपचार घेणारे बारा जण राहत होते. गुरुवारी रात्री ते गाढ झोपले होते. मात्र आल्हाट साडेतीनच्या सुमारास जागा झाला. तो थेट राठी झोपलेल्या ठिकाणी गेला. राठी गाढ झोपेत असताना, त्याच्या तोंडावर टॉवेल ठेवला. यानंतर काचेच्या तुकड्याने त्याचा गळा चिरला.
राठी जिवाच्या अकांताने ओरडत असताना इतर सहकारी जागे झाले. मात्र आल्हाट याचा आवेश आणि राठी याच्या गळ्यातून वाहणाऱ्या रक्ताच्या धारांमुळे सगळे जागीच स्तब्ध झाले. राठी तडफडून मेल्यावर, आल्हाट शांत होऊन स्वत:च्या जागेवर गेला. राठी हा फेब्रुवारी महिण्यात उपचारासाठी दाखल होता, तर आल्हाट हा ऑगस्ट महिण्यात दाखल झाला होता. दोघांनाही दारुचे व्यसन होते.





