Nagar | कु-हाडीने वार करणाऱ्यास तीन वर्षांची शिक्षा

नगर, (प्रतिनिधी) – पूर्ववैमनस्यातून तरूणावर कुऱ्हाडीने वार केल्याबद्दल गणेश बाबासाहेब क्षीरसागर (वय ३७, रा. घोटण, ता. शेवगाव) याला तीन वर्ष सक्तमजुरी आणि दंडची शिक्षा प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी ठोठावली.
चंद्रकांत बाबूराव क्षीरसागर आणि गणेश बाबासाहेब क्षीरसागर यांच्यामध्ये यापूर्वी वाद झाले होते. या प्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घोटण गावात दि. ६ ऑक्टोबर २०१६ रोजी रात्री साडे सात वाजता गणेश याने चंद्रकांतची भेट घेतली. ‘तुझ्यावरील केलेली केस मी मागे घेतो, तु मला पैसे दे. परंतु चंद्रकांत यांनी हे म्हणणे ऐकले नाही व त्यास पैसे दिले नाही.
याचा गणेशला राग आला व त्याने त्याचे हातात आणलेल्या कु-हाडीने डोक्यावर दोन- तीन घाव घालून जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने गंभीर दुखापती केल्या. चंद्रकांतचा भाचा योगेश याने ही घटना पाहिली होती.
याबाबत शेवगाव पोलीस ठाण्यात गणेशच्या विरोधात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन राऊत यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने ८ साक्षीदार तपासण्यात आले.
त्यामध्ये फिर्यादी चंद्रकांत क्षीरसागर, डॉ. तुषार कोहक, तपासी अंमलदार पोलीस उपनिरीक्षक सचिन राऊत, साक्षीदार योगेश शेळके यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. साक्षीदारांचा आलेला पुरावा व युक्तिवाद ग्राहय धरून न्यायालयाने आरोपी गणेश क्षीरसागर यास दोषी धरून तीन वर्ष सक्तमजुरी व ५ हजार रूपये दंडाची शिक्षा, दंड न भरल्यास आणखी तीन महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.
सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील जी. के. मुसळे यांनी काम पाहिले. पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महेश जोशी व पोलीस अंमलदार अशोक बेळगे यांनी सहकार्य केले.





