Pune : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्याला तीन वर्षे सक्तमजुरी

पुणे – महाविद्यालयातून घराकडे निघालेल्या अल्पवयीन अकरावीत शिकणाऱ्या मुलीचा हात धरून विनयभंग करणाऱ्याला तीन वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा विशेष न्यायाधीश के.के.जहागिरदार यांनी सुनावली. दंड भरल्यास ती रक्कम पीडितेला देण्यात यावी. दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असेही न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.
अनिल राजेंद्र लिंबोरे (वय 24, रा. शिवरी, ता. पुरंदर) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अरूंधती ब्रम्हे यांनी काम पाहिले. त्यांनी चार साक्षीदार तपासले. त्यामध्ये प्रत्यक्षदर्शीची साक्ष महत्त्वाची ठरली. पुरंदर तालुक्यातील वाळूंज येथे घडलेल्या या प्रकाराबाबत 16 वर्षीय मुलीने जेजुरी पोलिसात याबाबत फिर्याद दिली होती.
त्यानुसार पोलिसांनी विनयभंग आणि बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 8 नुसार गुन्हा दाखल केला होता. पोलीस उपनिरीक्षक एन.एच.सोनवलकर यांनी या प्रकरणाचा तपास केला. 16 वर्षीय पीडित महाविद्यालयातून घराकडे चालली होती. त्यावेळी “थांब तुझ्याशी बोलायचे आहे’ असे म्हणत हात धरून तिचा विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. य प्रकरणात पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.





