nagar | शिर्डीच्या खेळपट्टीवर तीन तिघाडा अन् खेळ बिघाडा !

नेवासा, (प्रतिनिधी)- शिर्डी लोकसभा मतदारसंघात ऐनवेळी निवडणुकीच्या राजकीय खेळपट्टीवर वंचित बहुजन आघाडीकडून दलित चळवळीतील अभ्यासू नेत्या उत्कर्षा रुपवते यांनी राजकीय रणांगणात उडी घेतल्यामुळे शिर्डीच्या मैदानात ऐनवेळी तीन तिघाडा अन् खेळ बिघाडा वातावरण निर्माण झाले.
दोन सेनेच्या जांगडगुत्त्यात उत्कर्षा रुपवते यांच्या ‘प्रेशर कुकर’च्या झटक्यामुळे कोण होणार खासदार? याचे राजकीय कोडे डोके खाजवूनही राजकीय निरीक्षकांना सुटता सुटत नाही. कोडे सोडविण्याच्या नादात ‘प्रेशर कुकर’च्या झटक्याने राजकीय निरीक्षकांच्या डोक्याला मुंग्या येत असल्याचे दिसून येत आहे
शिर्डीच्या राजकीय रणांगणात आता कोण मारणार बाजी? या कोड्याचे उत्तर आता मंगळवारी (दि.४) सुटणार आहे. या निकालाच्या कोड्याचे गणित सोडविण्यासाठी अनेकांच्या बत्त्या गुल झालेल्या असल्या तरी उद्याच्या लागलेल्या निकालातूनच हे चित्र स्पष्ट होणार आहे
शिर्डी मतदारसंघ हा पूर्वाश्रमीचा कॉंग्रेसचा बोलेकिल्ला असतानाही येथील दिग्गज नेत्यांच्या एकमेकांच्या राजकीय कुरघोड्यामुळे हा मतदारसंघावर सुमारे गेल्या १५ वर्षांपासून शिवसेनेने वर्चस्व सिद्ध केले आहे. शिर्डी मतदारसंघात सेनेचे दोन उमेदवार आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार रुपवते या तीनही उमेदवारांना विजयाच्या मोठ्या आशा आहेत.
त्यामुळे या मतदारसंघातील कोणी म्हणतात माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे हे हमखास निवडून येणार आहे. दुसरीकडे खासदार लोखंडे यांची शिर्डी मतदारसंघात हॅटट्रिक ही फिक्स असल्याचा दावा शिवसेनेकडून व्यक्त केला जात आहे. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार रुपवते विजयी होणार असल्याचे कार्यकर्त्यांतून बोलले जात आहे.
राजकीय अंदाज आणि मतदारांचा कौल प्रत्येक उमेदवार काढत असून या विजयाचे गणित मांडत असला तरी जनमतातला खरा खासदार कोण? याचा फैसल्याचा निर्णय उद्या मंगळवारी होणार असल्यामुळे उमेदवारांची धाकधूक आणि मतदारांत कोण निवडून येणार याची चलबिचल मतदारसंघात शिगेला पोहोचली आहे.





