Assam Politics: असाममध्ये निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठे खिंडार; 3 टर्मचे आमदार अब्दुर राशिद मंडल यांचा राजीनामा
Assam Politics:

Assam Politics: असाम विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसमधील गळती थांबण्याचे नाव घेत नाहीये. आज सोमवारी (१६ फेब्रुवारी) काँग्रेसला एकापाठोपाठ एक धक्के बसले असून, गोलपारा वेस्ट मतदारसंघाचे सलग तीन वेळा आमदार राहिलेले अब्दुर राशिद मंडल यांनी पक्षाचा त्याग केला आहे. निवडणुकीच्या तोंडावर मंडल यांचा राजीनामा हा काँग्रेससाठी मोठा राजकीय फटका मानला जात आहे.
दिवसभर राजकीय पेचप्रसंग –
आजचा दिवस असाम काँग्रेससाठी प्रचंड उलथापालथीचा ठरला. सकाळी ज्येष्ठ नेते रिपुन बोरा यांनी पक्षाचा निरोप घेतला, तर त्यापाठोपाठ प्रदेशाध्यक्ष भूपेन कुमार बोरा यांनीही आपल्या पदाचा राजीनामा देऊन खळबळ उडवून दिली होती. मात्र, काही तासांच्या नाट्यानंतर भूपेन कुमार बोरा यांनी आपला राजीनामा मागे घेतला असला, तरी अब्दुर राशिद मंडल यांच्या जाण्याने पक्षाला मोठे नुकसान सोसावे लागणार आहे.
‘रायजोर दल’मध्ये प्रवेश –
काँग्रेसला रामराम ठोकल्यानंतर अब्दुर राशिद मंडल यांनी अखिल गोगोई यांच्या नेतृत्वाखालील प्रादेशिक पक्ष ‘रायजोर दल’ मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. २०२० मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने गेल्या काही काळापासून असाममध्ये आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात केली आहे. मंडल यांच्या प्रवेशामुळे रायजोर दल अधिक प्रबळ होण्याची शक्यता आहे.
भाजपचा दावा: काँग्रेसमध्ये अजून पडझड होणार –
काँग्रेसमधील या खळबळीवर मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी निशाणा साधला आहे. “निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे अनेक दिग्गज आमदार पक्ष सोडणार आहेत, ही तर केवळ सुरुवात आहे,” असा दावा मुख्यमंत्री सरमा यांनी केला आहे.
एकीकडे विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू असतानाच, बड्या नेत्यांनी साथ सोडल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निराशेचे वातावरण असून आगामी निवडणुकीत याचे काय परिणाम होतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





