Pimpri : आरटीईतून तीन हजार विद्यार्थ्यांना प्रवेश

पिंपरी : आरटीई कायद्यांतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना २५ टक्के मोफत प्रवेश देण्यात येत आहे. शासनाच्या वतीने ऑनलाइन प्रक्रिया राबविण्यात आली. पिंपरी-चिंचवड विभागातून ३४३५ जागांसाठी अर्ज मागविण्यात आले होते. त्यापैकी बहुतांश जागांवर प्रवेश पूर्ण झाले आहेत. यापैकी ४०७ जागांवर प्रवेश न झाल्याने या जागा रिक्त राहिल्या आहेत. तर ३ हजार २८ विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाले असून शिकवणीला सुरूवात झाली आहे.
आरटीई प्रवेशपात्र असलेल्या २०२५-२६ या शैक्षणिक वर्षामध्ये पिंपरी-चिंचवड विभागामध्ये १७० शाळा होत्या. त्यामध्ये ३ हजार ४३५ जागांसाठी पालकांनी नोंदणी केली होती. पहिल्या फेरीमध्ये ३४३५ विद्यार्थ्यांना लॉटरी लागली. त्यामधील २२७५ विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीमध्ये प्रवेश घेतला. दुसऱ्या फेरीमध्ये लॉटरी लागलेल्या १०४६ विद्यार्थ्यांपैकी ४९९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले.
तर तिसऱ्या फेरीमध्ये ४२६ जणांची सोडत निघाली त्यापैकी १८३ विद्यार्थ्यांनी आपला प्रवेश निश्चित केला आहे. चौथ्या आणि पाचव्या फेरीमध्ये अनुक्रमे १३८ पैकी ४७ आणि ५६ पैकी २४ विद्यार्थ्यांचा प्रवेश झाला. पाच फेर्यानंतर शहरातील एकूण ३०२८ विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली. पाच फेऱ्यांनंतरही अनेक पालकांनी प्रवेश घेतले नसल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे ४०७ जागा रिक्त राहिल्या आहेत. शिक्षण विभागाच्या वतीने कागदपत्र पडताळणीसाठी उन्नत केंद्राची स्थापना करण्यात आली होती. प्रवेश पात्र पालकांच्या मोबाइलवर एसएमएसही पाठविण्यात आले होते. मात्र तरीही काही पालकांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली आहे. अॅपच्या माध्यमातून नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे शाळा आणि अर्जदाराचे घराचे ठिकाण याचे अंतर ठरविण्यात आले होते. त्यामुळे प्रक्रिया सुरळित होण्यास मदत झाली. पाच फेर्या पूर्ण झाल्या असून आरटीईची प्रवेश प्रक्रिया थांबवण्यात आली आहे.
३० जणांचा प्रतिसाद नाही
दरम्यान, लॉटरी मध्ये नंबर येऊनही तीस पालकांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. पहिल्या फेरीमध्ये ही संख्या १ हजार होती. त्यानंतर दुसर्या व तिसर्या फेरीमध्ये या पालकांनी प्रतिसाद देत प्रवेश प्रक्रिया पूर्ण केली.
फेरी – निवड झालेले – निश्चित केलेले प्रवेश
पहिली फेरी- ३४३५- २२७५
दुसरी फेरी -१०४६- ४९९
तिसरी फेरी – ४२६- १८३
चौथी फेरी- १३८ – ४७
पाचवी फेरी – ५६ – २४
एकूण – ३४३५ – ३०२८
पाच फेर्यांनंतर आरटीईची प्रवेश प्रक्रिया थांबवण्यात आली आहे. शहरामध्ये ३४३५ जागांपैकी ३०२८ जागांवर प्रवेश झाले आहेत. काही पालकांनी प्रतिसाद न दिल्याने जागा रिक्त राहिल्या आहेत. यंदा वेळेत सर्व प्रक्रिया पार पडल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही.
– संगिता बांगर, प्रशासन अधिकारी. शिक्षण विभाग, पिंपरी चिंचवड महापालिका.





