डिव्हिलियर्सची तुफानी फटकेबाजी
जोहान्सबर्ग – एकदिवसीय सामन्यात एकाच वेळी तीन संघ खेळवत थ्री टीम क्रिकेटचा मदतनिधी सामना येथे चांगलाच रंगला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करेल अशी चर्चा असलेल्या एबी डिव्हिलियर्सने केवळ 24 चेंडूत 61 धावांची तुफानी फडकेबाजी केली व आपल्या इगल्स संघाला सुवर्णपदक मिळवून दिले.
तीन संघांत खेळवलेल्या या सामन्यात नाणेफेकही अभिनव पद्धतीने झाली. तीन बॉक्समध्ये तीन रंगांचे चेंडू ठेवले गेले व त्यावर 1, 2 व 3 असे क्रमांक टाकण्यात आले. ज्या संघाच्या कर्णधाराला 1 क्रमांकाचा चेंडू आला त्या संघाने प्रथम फलंदाजी केली. डिव्हिलियर्सला 3 क्रमांकाचा चेंडू आला.
किंगफिशर संघाने पहिल्यांदा फलंदाजी करताना 6 षटकांत 2 बाद 56 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इगल्स संघाने एडन मार्क्रमच्या फटकेबाजीच्या जोरावर पहिल्या सहा षटकांत 1 बाद 66 तर काइट्स संघाने 1 बाद 58 धावा केल्या. दुसऱ्यांदा फलंदाजीला आलेल्या एबी डिव्हिलियर्सच्या इगल्स संघाने 12 षटकांत 4 बाद 160 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल काइट्स संघ 3 बाद 138 तर किंगफिशर संघ 5 बाद 113 धावांपर्यंत मजल मारू शकला. त्यामुळे इगल्सच्या संघाला सुवर्णपदक बहाल करण्यात आले. डिव्हिलियर्सने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दिमाखात पुनरागमन करू शकतो हे सिद्ध केले.