अभिनेता विविके ओबेरॉयला 1.55 कोटींना घातला गंडा ! तिघांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल

मुंबई – बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉयसोबत फसवणूक केल्याचं प्रकरण समोर आलं आहे. विवेकच्या स्वतःच्या व्यावसायिक भागीदारांनी त्याची 1.55 कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी विवेक ओबेरॉय यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
बॉलीवूड अभिनेता विवेकला तीन जणांनी 1.55 कोटी रुपयांना गंडा घातला असल्याचे समोर आले आहे. विवेकाला त्याच्या काही व्यावसायिक भागीदारांनी इव्हेंट आणि चित्रपट निर्मिती फर्ममध्ये चांगला परतावा देण्याचे आश्वासन दिले होते, परंतु या तिघांनी विवेकने दिलेले पैसे त्यांच्या वैयक्तिक कामासाठी वापरले असल्याचा आरोप विवेककडून करण्यात आला आहे. पोलिसांनी अभिनेत्याची तक्रार नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, अभिनेत्याच्या चार्टर्ड अकाउंटंटने अंधेरी पूर्व येथील एमआयडीसी पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध तक्रार दाखल केल्यानंतर बुधवारी ही घटना उघडकीस आली. तक्रारीनुसार, चित्रपट निर्मात्यासह तीन आरोपी अभिनेत्याचे व्यावसायिक भागीदार होते आणि त्यांनी त्याला एका इव्हेंट आणि चित्रपट निर्मिती फर्ममध्ये पैसे गुंतवण्यास सांगितले होते.
पोलिसांनी सांगितले की, अभिनेत्याने या प्रोजेक्टमध्ये 1.55 कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती, परंतु आरोपींनी गुंतवलेले पैसे स्वतःच्या हेतूसाठी वापरले. अभिनेत्याची पत्नी देखील या फर्ममध्ये भागीदार होती, असे अधिकाऱ्याने सांगितले. भारतीय दंड संहितेच्या कलम 34, 409, 419 आणि 420 अंतर्गत या तिघांविरुद्ध एफआयआर नोंदवण्यात आला आहे.





