धाराशिव जिल्ह्यातील बावी गावात तीन जणांचा खून

धाराशिव – जिल्ह्यातील करमाळा पोलिस ठाणे हद्दीत बावी या गावात पारधी वस्तीवर तीन जणांचा खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतात पाणी देण्याच्या कारणावरून मध्यरात्री दोन गटांमध्ये झालेल्या वादातून हा प्रकार घडला आहे. यात एका गटातील दोघांचा तर दुसऱ्या गटातील एकाचा जीव गेला आहे. घटनेची माहिती मिळताच करमाळा पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून मृतांचे शव विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. या प्रकरणातील पाच आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
कत्ती-कोयत्याने जबर मारहाण झाल्याने एकाच कुटूंबातील तिघांचा मृत्यू या घटनेत झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी असून, त्यांच्यावर धाराशिवच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु करण्यात येत आहेत.
पारधी समाजातील दोन गटात विहिरीतील पाणी घेण्यावरुन वाद होता. रविवारी सायंकाळी हा वाद पुन्हा पेटला. दरम्यान, बाचाबाचीनंतर रात्री ९ वाजण्याच्या सुमारास हे दोन्ही गट आमनेसामने आले. त्यांच्यात कत्ती-कोयते, दगड, काठीने जबर हाणामारी झाली. या घटनेत एकाचा जागीच मृत्यू झाला. तर दुसऱ्याचा वाशी येथील रुग्णालयात मृत्यू झाला. उर्वरित दोघांना धाराशिवच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता येथे आणखी एकजण मृत्यूमुखी पडला. चौथ्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
मयतामध्ये आप्पा भाऊ काळे, परमेश्वर आप्पा काळे, सुनिल परमेश्वर काळे यांचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच येरमाळा ठाण्याचे पोलिस पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संशयित म्हणून जवळपास 10 जणांना ताब्यात घेतले असून, याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरु होती.





