पुणे महानगरपालिका अग्निशामक दलाच्या तिघांना स्वातंत्र्य दिनानिमित्त “गुणोत्कृष्ट अग्निशमन सेवा पदक”

पुणे: पुणे महानगरपालिकेच्या अग्निशामक दलातील सेवानिवृत्त स्टेशन ड्युटी ऑफिसर सुभाष प्रभाकर जाधव, सेवानिवृत्त फायर इंजिन ड्रायव्हर रामचंद्र तुकाराम गोसावी आणि फायरमन छगन ताराचंद मोरे यांना स्वातंत्र्य दिनानिमित्त (१५ ऑगस्ट २०२५) देशाचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून “गुणोत्कृष्ट अग्निशमन सेवा पदक” जाहीर झाले आहे. या मानाच्या पुरस्काराने पुणे अग्निशामक दलाचा गौरव वाढला आहे.
सुभाष जाधव यांचे उल्लेखनीय योगदान-
सुभाष जाधव १९९१ मध्ये फायरमन म्हणून पुणे महानगरपालिका अग्निशामक दलात दाखल झाले आणि एप्रिल २०२५ मध्ये स्टेशन ड्युटी ऑफिसर म्हणून सेवानिवृत्त झाले. त्यांना यापूर्वी २००४ मध्ये “राष्ट्रपती शौर्य पदक” मिळाले आहे. त्यांनी ३४ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत अनेक धाडसी कामगिरी केल्या. विशेषत: २०२१ मध्ये सिरम इन्स्टिट्यूट मांजरी, फॅशन स्ट्रीट, पुणे कॅम्प आणि २०२३ मध्ये वडगाव शेरी येथील मल्टिप्लेक्स थिएटर, भवानी पेठ टिंबर मार्केट आणि काकडे वस्ती, बिबवेवाडी येथील आगीच्या घटनांमध्ये त्यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर जिवित आणि वित्तहानी टाळण्यात मोलाची भूमिका बजावली. त्यांच्या या कामगिरीबद्दल महानगरपालिकेने त्यांना वेळोवेळी रोख पारितोषिकाने गौरवले आहे.
रामचंद्र गोसावी यांचे मोलाचे कार्य –
रामचंद्र गोसावी १९९१ मध्ये फायर इंजिन ड्रायव्हर म्हणून दलात रुजू झाले आणि एप्रिल २०२५ मध्ये त्याच पदावरून सेवानिवृत्त झाले. त्यांनी २०१८ मध्ये पाटील इस्टेट झोपडपट्टी, वाकडेवाडी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, मार्केट यार्ड, २०१९ मध्ये शनिवार पेठ, २०२२ मध्ये सोपान नगर, वडगाव शेरी आणि २०२३ मध्ये भवानी पेठ टिंबर मार्केट येथील आगीच्या घटनांमध्ये आपल्या कौशल्याने मोठ्या प्रमाणात वित्तहानी टाळली. त्यांच्या या धाडसी कामगिरीसाठी त्यांना महानगरपालिकेने अनेकदा रोख पारितोषिक देऊन सन्मानित केले आहे.
छगन मोरे यांचे धैर्यशाली कृत्य –
छगन मोरे १९९५ मध्ये फायरमन म्हणून दलात दाखल झाले आणि सध्या ते अग्निशमन मुख्यालयात कार्यरत आहेत. त्यांनी २०१३ मध्ये कोथरूड येथील त्रिमूर्ती हाईटस येथील भीषण आगीत नागरिकांची सुटका, २०१४ मध्ये विश्रांतवाडी, आरटीओ ऑफिस जवळील आग, २०२३ मध्ये भवानी पेठ टिंबर मार्केट येथील आगीच्या घटनांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. याशिवाय, २०१६ मध्ये मांडवगण फराटा, श्रीगोंदा येथे कुपनलिकेत पडलेल्या ५ वर्षीय मुलाला ३६ तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढले. तसेच, २०२३ मध्ये कोल्हापूर येथील पूरपरिस्थितीत त्यांनी विशेष कामगिरी बजावली. या सर्व कामगिरीसाठी त्यांना महानगरपालिकेने रोख पारितोषिकाने गौरवले आहे.
दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी यांचेकडून अभिनंदन –
पुणे अग्निशामक दलाचे मुख्य अग्निशमन अधिकारी देवेंद्र पोटफोडे यांनी या पुरस्कार प्राप्तकर्त्यांचे अभिनंदन करताना सांगितले की, “आमचे जवान कायम कर्तव्याशी एकनिष्ठ राहिले आहेत. या पुरस्कारामुळे दलाचा गौरव वाढला आहे.” त्यांनी पदक विजेत्यांचे कौतुक करत समाधान व्यक्त केले. हा पुरस्कार पुणे महानगरपालिका अग्निशामक दलाच्या समर्पित सेवेचा आणि त्यांच्या धाडसी कामगिरीचा सन्मान आहे.





