Pimpri : गोळी न सुटल्याने वाचला तिघांचा जीव

पिंपरी : तरुणाने आपली पत्नी व सासू-सासर्यांना मारण्यासाठी पिस्तुल लोड केले. परंतु गावठी पिस्तुल असल्याने ट्रिगरच दाबला गेला नाही आणि पत्नीसह तिघांचे प्राण वाचले. ही घटना रविवारी (दि. २९) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास खेड तालुक्यातील निघोजे येथे घडली.
हरिष अशोक काकडे (वय २४, रा. शिवाजीवाडी, मोशी) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याबाबत त्याच्या २१ वर्षीय पत्नीने सोमवारी (दि. ३०) महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेने आपल्यासोबत मोशी येथे सासरी यावे यासाठी आरोपी निघोजे येथे आला होता. त्याचे पत्नीशी भांडण झाल्यावर तिच्या हातातील मोबाइल त्याने खेचून घेतला. तू घरी चल नाहीतर येथेच तुला गोळी घालेल, अशी धमकी त्याने पत्नीला दिली.
त्यानंतर आरोपी हरीष काकडे सासर्याला म्हणाला की मला तुमच्याशी १० मिनिटे बोलायचे आहे, असे म्हणत त्याने कमरेला खोचलेली पिस्तुल बाहेर काढून लोड केली. तुमच्या तिघांना मी ठेवत नाही, असे म्हणून पत्नीच्या दिशेने पिस्तुल रोखले. आरोपी काकडे याने ट्रिगर दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र गावठी पिस्तुल असल्याने त्याचा ट्रिगर दाबला गेला नाही. पत्नीने तातडीने झडप घालून पिस्तुल हिसकावण्याचा प्रयत्न केला. तिच्या मदतीला आई वडिलही आले. त्या तिघांनी मिळून हरिष काकडे याच्या हातातून पिस्तुल हिसकावून घेतले.
त्यानंतर आरोपी तेथून निघून गेला. त्यानंतर सासऱ्याला फोन करुन धमकी दिली की, तुम्ही जर पोलिसात तक्रार दिली तर मी दोन-तीन महिने जेलामध्ये जाईल. मात्र सुटून आल्यावर मी तुम्हाला सोडणार नाही.





