Bhimashankar News | भीमाशंकरमध्ये तीन लाख भाविकांची उपस्थिती ; बम बम भोलेच्या गजरात भक्तिमय वातावरण

प्रभात वृत्तसेवा
मंचर – बारा ज्योतिर्लिंगांपैकी सहावे असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर येथे पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त तब्बल तीन लाख भाविकांनी पहाटेपासूनच हर हर महादेव आणि बंम बंम भोलेच्या गजरात भगवान शंकराच्या पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले.श्रावणसरींच्या हलक्या सरी, मंद थंडी आणि दाट धुक्यामुळे मंदिर परिसरात आध्यात्मिक वातावरण तयार झाले होते. दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी दर्शनानंतर परिसरातील निसर्गाचा आनंद घेत पर्यटनालाही पसंती दिली.
उत्तर भारतात श्रावण महिना 25 जुलै ते 23 ऑगस्टदरम्यान साजरा होतो. महाराष्ट्रात मात्र हा कालावधी पुढील दीड महिन्यापर्यंत असतो. त्यामुळे भीमाशंकर येथे जलाभिषेक, दुग्धाभिषेक, बेलपत्र अर्पणासाठी श्रावणभर भाविकांची मोठी गर्दी होत असते. शनिवार-रविवारच्या सुट्यांमुळे आधीच मंदिर परिसरात भाविकांची संख्या वाढली होती. त्यात श्रावणी सोमवार हा शंकर उपासनेसाठी विशेष मानला जात असल्याने सोमवारी हजारो भक्तांनी रांगेत उभे राहून दर्शन घेतले. काही भाविकांनी कळस दर्शन घेत परतीचा मार्ग धरला.
घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक सागर पवार यांच्या मार्गदर्शनाखाली परिसरात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. एस.टी. महामंडळाच्या वतीने पार्किंग क्र. 4 ते बसस्थानक दरम्यान 25 मोठ्या बसेसची व्यवस्था करण्यात आली होती. वाहतूक निरीक्षक टी. एन. पवळे, मारुती खळदकर, देवराम लोहकरे यांनी नियोजनात विशेष भूमिका बजावली.
एमटीडीसीपर्यंत भाविकांची रांग
तळेघर ते निगडाळे परिसरामध्ये रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे हे खड्डे चुकविताना वाहन चालकांची दमछाक होत होती. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे भाविकांना धक्के खात भीमाशंकरच्या दर्शनाला जावे लागले, यामुळे भाविकांनी मोठी नाराजी व्यक्त केली. भीमाशंकरला व्हीआयपी दर्शन अन अभिषेक यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी असूनही दर्शन रांगेमध्ये लवकर दर्शन होत नसल्यामुळे तीव्र नाराजी भाविकांकडून व्यक्त होत होती. जुनी एमटीडीसीपर्यंत भाविकांची लांबचलांब रांग होती.





