Pune District : तीन लाख भाविकांनी घेतले बाबीर देवाचे दर्शन
Pune District : तसेच अमोल भिसे मित्र मंडळाच्या वतीने गजेढोल स्पर्धा घेण्यात आल्या. लोप पावत चाललेली ही कला या यात्रेत टिकून आहे.

कळस : रुई (ता. इंदापूर) येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बाबीर गडावर बाबीर देवाच्या यात्रेसाठी तीन दिवसात सुमारे तीन लाख भाविकांनी दर्शन घेतले. यात्रेनिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी यात्रा काळात देवदर्शनासाठी हजेरी लावल्याने परिसर बाबीर देवाच्या नावाने चांगभलं म्हणत अलोट गर्दीने फुलला होता.
विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, महादेव जानकर, कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार, श्रीरामपुरचे आमदार हेमंत ओगले जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने, उपविभागिय पोलीस अधिकारी चैतन्य कदम यांनी देवदर्शनाचा लाभ घेतला.
मंगळवारी (दि. १०) दिवाळी पाडव्यादिवशी निमोणे (ता.संगमनेर) येथुन परंपरेप्रमाणे पायी चालत आलेली बाबीरभक्त साहेबराव मंडलिक यांची हजारो भक्तांची पायीदिंडी रुई गावात आल्यानंतर देवाच्या पालखीने मंदिराकडे प्रस्थान ठेवले. गुलालाची उधळण, तोफांची सलामी व ढोलाच्या निनादात पालखी मंदिरस्थळी आली.
यानंतर येथील थोरातवाडी देवाचे मानकरी मधुकर थोरात, आप्पा थोरात, यांनी देवाचा घट हलविल्यानंतर यात्रेस सुरवात झाली. यावेळी भाविकांनी देवदर्शनासाठी हजेरी लावण्यास सुरवात केली. बुधवार (दि. ११) हा यात्रेचा मुख्य दिवस होता. यावेळी देवदर्शनासाठी मोठी गर्दी झाली होती. दिवसभर नवस फेडीचा कार्यक्रम झाला.
तसेच अमोल भिसे मित्र मंडळाच्या वतीने गजेढोल स्पर्धा घेण्यात आल्या. लोप पावत चाललेली ही कला या यात्रेत टिकून आहे. तसेच, घोंगडी बाजारपेठेत मोठी उलाढाल झाली असून सुमारे पाच हजार नगांची विक्री झाली. तसेच घरगुती लाकडी वस्तू व यात्रा बाजारातही मोठी उलाढाल झाली. महिलांनी यात्रेमध्ये घरगुती वस्तू खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचे दिसत होते. सायंकाळी मनोरंजन कार्यक्रम झाला. यात्रेच्या तिसर्या दिवशी गुरुवारी (दि. १२) सकाळी नवसाच्या बाळाला पाळण्यात बसवून झुला देवुन नवस फेडण्यात आला. तसेच, भाकणुक व बगाडाचा कार्यक्रम झाला.
वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या वतीने सहाय्यक पोलिस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रेकरुंना वाहतूक कोंडीला सामोरे जाऊ नये यासाठी उत्कृ्ष्ट नियोजन केले होते. आरोग्य विभागामार्फत येथे बुथ उभारण्यात आले होते. यामध्ये भाविक रुग्णांना चोवीस तास सेवा पुरवण्यात आली. पिण्याच्या पाण्याची सोय नेचर डिलाइट, सोनई, हर्षवर्धन पाटील मोटारवाहतूक संघ यांनी केली. तहसीलदार जीवन बनसोडे, ग्रामपंचायत व देवस्थानचे अध्यक्ष अजितसिंह पाटील यांनी मुलभुत सुविधा उपलब्ध करून दिल्या.





