हमासकडून तीन इस्रायली महिला ओलिसांची सुटका; परतताच कुटुंबीयांना अश्रू अनावर

Hamas Released Israeli Hostages | इस्रायल-हमास संघर्षावर अखेर युद्धविरामाची घोषणा करण्यात आली आहे. शनिवारी इस्रायलच्या मंत्रिमंडळाने हमाससोबतच्या युद्धविराम कराराला मंजुरी दिली होती. पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या कार्यालयाने एक निवेदन जारी करून याची पुष्टी केली आहे.
यानंतर हमासने सोडण्यात येणाऱ्या ओलिसांची यादी इस्रायलला पाठवली. तीन महिलांच्या नावांची यादी देण्यास हमासने उशीर केल्यामुळे करार अंमलात येण्यास काही तास उशीर झाला. मात्र आता हमासने तिन्ही महिलांची सुटका केली आहे.
इस्रायली नागरिक परतताच कुटुंबीयांना अश्रू अनावर
युद्धविरामाच्या करारानुसार पहिल्या टप्प्यात सहा आठवड्यांच्या कालावधीत युद्ध थांबवले जाईल, तसेच हमासच्या ताब्यातील ओलिसांची आणि इस्रायलच्या ताब्यातील पॅलेस्टिनी कैद्यांची सुटका केली जाईल. गेल्या १५ महिन्यांपासून हमासच्या कैदेत असलेल्या तीन इस्रायली नागरिक परतताच कुटुंबीयांना अश्रू अनावर झाले. रोमी जोनेन, डोरोन स्टीनब्रीचर आणि एमिली डेमरी या तीन महिलांची हमासने सुटका केली. यांना रेड क्रॉस अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर त्या इस्रायलमध्ये परतल्या.
हमासच्या अतिरेक्यांनी ७ ऑक्टोबर २०२३ रोजी हल्ला केला होता. या हल्ल्यात १२०० इस्रायली नागरिक मारले गेले होते. त्याचवेळी या तीन महिलांना अतिरेक्यांनी पकडून ओलीस ठेवले होते. करारानुसार पहिल्या टप्प्यात सुटका झालेले ओलीस परतल्यानंतरच्या क्षणांचे व्हिडीओ इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी शेअर केला आहे.
इस्रायलचा ध्वज खांद्यावर घेऊन तीन महिला त्यांच्या कुटुंबीयांना भेटल्या. आपल्या माणसांना भेटल्यानंतर तिघींच्याही अश्रूंचा बांध फुटला. हमासने मारलेल्या ओलीसांचे मृतदेहही इस्रायलकडे सोपवले जाणार आहेत. यातील एका महिलेसोबत हमासने भयंकर कृत्य केल्याचे समोर आले. अतिरेक्यांकडून एका महिलेचे दोन बोट कापून टाकण्यात आली आहेत.
युद्धविराम करार 3 टप्प्यात पूर्ण होणार
युद्धविराम करार 3 टप्प्यात पूर्ण होईल. पहिल्या टप्प्यात हमास इस्रायलमधून अपहरण केलेल्या 33 ओलिसांची सुटका करणार आहे. तसेच, इस्रायली सैन्य गाझा सीमेपासून 700 मीटर मागे हटणार आहे. इस्रायलमधील न्याय मंत्रालयाने 95 पॅलेस्टिनी कैद्यांची यादीही जारी केली आहे. या यादीत समाविष्ट असलेले अनेक लोक हत्येच्या आरोपाखाली जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत, ज्यात हमास आणि पॅलेस्टिनी इस्लामिक जिहादचे सदस्य आहेत.
दरम्यान, हमासने 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलमध्ये प्रवेश केला, 1200 लोकांना ठार केले आणि 251 लोकांना ओलीस ठेवले. त्यानंतर काही तासांनी इस्रायली सैन्याने गाझावर हल्ला केला. 23 लाख लोकसंख्या असलेल्या गाझातील दोन टक्क्यांहून अधिक लोक युद्धात मारले गेले असून 90 टक्के लोक बेघर झाले आहेत. गाझा युद्धात सुमारे 400 इस्रायली सैनिकही मारले गेले आहेत.





