पुणे | तीन उमेदवारांनी केले अर्ज दाखल

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी दोन दिवसांत ४१ उमेदवारींनी अर्ज नेले असून, तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. गुरुपुष्यामृतच्या शुभ मुहूर्तावर गुरुवारी राष्ट्र्वादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच माजी आमदार बापू पठारे व त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे यांनी अर्ज दाखल केले.
त्यातही सायंकाळी बापू पठारे यांना अधिकृतपणे उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे सोमवारी बापू पठारे जोरदार शक्तिप्रदर्शन करून एबी फॉर्मसह पुन्हा अधिकृतरीत्या अर्ज दाखल करणार आहेत.
निवडणुकीसाठी अर्ज विक्री व अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली आहे. यात ७७ अर्जांची विक्री झाली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस अजित पक्षाकडून ३८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून, त्यात वडगावशेरी मतदारसंघ समाविष्ट नाही. विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांनी उमेदवारी आपल्यालाच मिळणार असल्याने निवडणूक लढविण्याचा चंगच बांधल्याचे दिसत आहे.
महायुतीच्या जागा वाटपात भाजपनेही वडगावशेरी मतदारसंघावर आपला दावा केला असून, माजी आमदार जगदीश मुळीक निवडणूक लढविण्याच्या प्रयत्नात आहेत. कार्यकर्त्यांच्या बैठका आणि मतदारांच्या गाठीभेटी घेण्याचे कामही त्यांनी पूर्वीच सुरू केले आहे. महाविकास आघाडीत राष्ट्र्वादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वाट्याला ही जागा मिळाली आहे.
या पक्षाकडून माजी आमदार बापू पठारे व त्यांचे चिरंजीव सुरेंद्र पठारे हे तीव्र इच्छुक होते. दोघांनीही गुरुवारी निवडणूक कार्यालयात आपले अर्जही दाखल केले आहेत. बहुजन समाज पक्षाकडून चंद्रकांत सावंत यांनी अर्ज भरला आहे.



