पुणे | वडगावशेरीत गुलाल कोणाचा ?

पुणे, {डॉ. राजू गुरव} – वडगावशेरी विधानसभा मतदार संघाच्या निवडणुकीत गावकी-भावकीचे राजकारण महत्त्वाचे ठरणार आहे. येथे महायुती विरुध्द महाविकास आघाडी असा सामना रंगणार असला, तरी दोन्ही राष्ट्रवादी काॅंग्रेसचे उमेदवार मैदानात उतरले आहेत. तर, येथून भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक हे निवडणूक लढविण्यावर अद्यापही ठाम असल्याने मोठा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे.
वडगाव शेरी मतदारसंघात महाविकास आघाडी, महायुतीतील अंतर्गत पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यातील अंतर्गत धुसफूस उफाळून येऊ लागलेली आहे. त्यामुळे कोणता झेंडा हाती घ्यायचा, कोणत्या उमेदवाराचे काम करायचे, कोणाला पाठिंबा द्यायचा याबाबत कार्यकर्ते, पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्यात संभ्रम असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या मतदात संघातून गुलाल कोणाचा, याबाबत उत्सुकता निर्माण झालेली आहे.
या मतदारसंघात आतापर्यंत कोणत्याही एका राजकीय पक्षाचे सातत्याने वर्चस्व राहिलेली नाही. त्यात स्थित्यंतरे झालेली आहेत. या मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी सर्वच पक्षांकडून इच्छुकांचा अधिक भरणा आहे.
तब्बल ४९ इच्छुकांनी उमेदवारांनी अर्ज नेले आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस-अजित पवार पक्षाकडून विद्यमान आमदार सुनील टिंगरे, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाकडून बापुसाहेब पठारे यांना अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झालेली आहे. भाजप, कॉंग्रेस या पक्षांच्या कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या बैठकांचे सत्र जोर धरू लागलेले आहेत. या पक्षांच्या इच्छुकांकडूनही निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने इच्छा प्रदर्शित केली जात आहे.
लोकसभा निवडणुकीत वडगावशेरीतून मुरलीधर मोहोळ यांना मताधिक्य मिळवून देण्यात माजी आमदार जगदीश मुळीक यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. त्यामुळे या मतदार संघातून निवडणुकीत उमेदवार देण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी आग्रही आहेत. मुळीक यांनी निवडणूक लढविण्यासाठी जोरदार तयारीही ठेवली असून, ते निवडणूक लढवण्यावर ठामच आहेत.
मात्र, भाजप नेत्यांकडून जो आदेश देईल त्याचे पालन मुळीक यांना करावे लागणार आहे. मुळीक हे भाजपचे निष्ठावंत असल्याने ते भाजप सोडून अन्य कोणत्याही पक्षाकडून निवडणूक लढविण्याचा कधीही विचार करणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे.
१. वडगावशेरीत मनसेचे सुमारे २५ हजारांच्या आसपात मतांचे “पॉकेट’ आहे. पक्षाकडून काही जण इच्छुकदेखील आहेत. मात्र, पक्षाकडून तसा निर्णय आलेला नाही. त्यामुळे मनसेही कोणत्या उमेदवाराला पाठिंबा देणार, असा प्रश्नही उपस्थित होऊ लागलेला आहे.
२. महायुतीने जागा वाटपात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ला राज्यात एकही जागा दिलेली नाही. त्यामुळे या पक्षाचे कार्यकर्ते नाराज आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराचे काम करण्याची या कार्यकर्त्यांची मानसिकता दिसत नाही. रामदास आठवले यांच्या आदेशाची कार्यकर्त्यांना प्रतीक्षाही लागलेली आहे.
३. या मतदारसंघात बसपा, राष्ट्रीय समाज पक्ष आणि अन्य राजकीय पक्षांकडूनही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहणार आहेत. त्यामुळे कोणाच्या पारड्यात मताधिक्य असेल, याची उत्कंठा आहे.
निधीची घोषणा, विकासाची प्रतीक्षा
पोर्शे कार अपघात प्रकरणामुळे वडगावशेरी मतदार संघ देशभरात चर्चेत आला. गेल्या काही वर्षांमध्ये या मतदार संघात मोठ्या विकास प्रकल्पासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीची केवळ घोषणाबाजी करण्यात आलेली आहे. प्रत्यक्षात प्रकल्प पूर्णत्वास आलेले नाही. पूरपीडितांना फारशी आर्थिक मदत कधी मिळालीच नाही. टँकर लॉबीच्या विकासाला सतत प्राधान्य मिळते.
नागरिकांना चोवीस तास पाणीपुरवठा केला जात नाही. वाहतूक कोंडीच्या समस्या सोडविण्यासाठी ठोस आराखडाही अंमलात आलेला नाही. मतदार संघात विविध प्रकारचे अवैध व्यवसाय बोकाळले आहेत. यामुळे मतदार संघातील नागरिक समस्यांनी हैराण झालेले आहेत.





