महाराष्ट्रातून भाजपचे तीन जण राज्यसभेवर जाणार; शिंदे, अजितदादा गटालाही प्रत्येकी एक जागा

मुंबई – राज्यसभेच्या ६ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत विधानसभेतील सध्याच्या संख्याबळानुसार भारतीय जनता पार्टीचे तीन उमेदवार सहजपणे विजयी होणार आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाच्या प्रत्येकी एका उमेदवारालही विजयाची संधी आहे. कॉंग्रेसचाही एक सदस्य राज्यसभेवर जाऊ शकणार आहे.
राज्यसभेच्या निवृत्त होत असलेल्या सदस्यांमध्ये शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांचा समावेश आहे. मात्र या दोन्ही पक्षांमध्ये उभी फूट पडली असून त्यांचे बहुतांश आमदार दुसऱ्या गटांत गेल्यामुळे शरद पवार आणि उध्दव ठाकरे यांना मोठा फटका बसणार आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ५३ आमदारांपैकी आपल्याकडे ४३ आमदार असल्याचे अजित पवार गटाचे म्हणणे आहे.
त्यामुळे राज्यसभा निवडणुकीत या गटाच्या एका उमेदवाराचा विजय सहज होणार आहे. तशीच स्थिती उध्दव ठाकरे यांचीही आहे. एकनाथ शिंदे गटाकडे बहुतांश आमदार असल्यामुळे त्यांचा एक जण सहज विजयी होऊ शकतो.
मात्र उध्दव ठाकरे यांच्याकडे केवळ १५ आमदार असल्यामुळे त्यांच्या उमेदवाराचा विजय अशक्य आहे. किंबहुना उध्दव ठाकरे गट आणि शरद पवार गट यांनी एकत्रितपणे जरी कोणता उमेदवार दिला तरी त्याला विजय मिळवता येणार नाही असे सध्याचे संख्याबळ सांगते.
भाजपचे प्रकाश जावडेकर, नारायण राणे आणि व्ही. मुरलीधरन यांची मुदत संपते आहे. तर कॉंग्रेसचे कुमार केतकर, उध्दव ठाकरे गटाचे अनिल देसाई आणि शरद पवार गटाच्या वंदना चव्हाण यांचीही मुदत संपते आहे. अजित पवार गटाकडून अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांना तर शिंदे गटाकडून नुकतेच कॉंग्रेसमधून शिंदे गटात दाखल झालेले मिलिंद देवरा यांना राज्यसभेवर पाठवले जाऊ शकते. भाजपची नावे मात्र दिल्लीतून ठरणार आहेत.





