218 कोटींच्या बोगस आयटीसी दाव्याप्रकरणी तिघांना अटक; राज्य जीएसटी पथकाची कारवाई

मुंबई – महाराष्ट्र जीएसटीच्या सर्वसमावेशक विश्लेषणात्मक साधनांद्वारे आणि जीएसटी पोर्टलवर उपलब्ध माहितीद्वारे नवीन नोंदणीकृत करदात्यांच्या गटाचे विश्लेषण करताना विभागाला काही करदात्यांचे 200 कोटींपेक्षा जास्त रकमेचे संशयास्पद व्यावसायिक व्यवहार लक्षात आले.
त्यानंतर 25 एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्य जीएसटीच्या पथकांद्वारे उल्हासनगर येथे असलेल्या एम्पायर एंटरप्राइजेस, शंकर एंटरप्रायझेस आणि एम.एम.एन्टरप्रायजेस या करदात्यांच्या विविध व्यावसायिक ठिकाणी तपासणी भेटी करण्यात आल्या. या सर्व करदात्यांनी घरोघरी गोळा केलेली वीज बिले यासारखी बनावट कागदपत्रे देऊन आणि जागा मालकांची परवानगी न घेताच, त्यांना अंधारात ठेवून भाडे-परवाना करार करून जीएसटी नोंदणी मिळवली असल्याचे तपासणी भेटीच्या वेळी आढळून आले.
या करदात्यांनी 218.26 कोटी रू किंमतीच्या करपात्र मूल्याच्या बोगस पावत्या इतर करदात्यांना कोणत्याही वस्तू किंवा सेवांचा पुरवठा न करता त्यांनी त्यांच्या लाभार्थींना 39.28 कोटींचा आयटीसी दावा केला असल्याचे आढळले.
याप्रकरणी शुक्रवारी महानगर दंडाधिकाऱ्यांनी शंकर एंटरप्रायझेसचे मालक शंकर आप्पा जाधव, (वय 37), एम्पायर एंटरप्रायझेसचे मालक बापू वसंत वाघमारे, (वय 36), आणि दस्तऐवज संकलन एजंट आदेश मधुकर गायकवाड, (वय 36) यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. या आर्थिक वर्षात राज्य जीएसटी विभागाने आत्तापर्यंत आठ जणांना अटक केली आहे.





