भोपाळ – मध्यप्रदेशात थेट न्यायाधीशाच्या सरकारी निवासस्थानावर हल्ल्याची धक्कादायक घटना घडली. त्या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. जामिनासाठीचा अर्ज फेटाळण्यात आल्याचा बदला घेण्यासाठी आरोपींनी ते कृत्य केल्याचे स्पष्ट झाले. मध्यप्रदेशच्या अनुपपूर जिल्ह्यात शनिवारी रात्री एका गटाने दुष्कृत्य केले. त्या गटाने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी अमनदीपसिंग छाबडा यांच्या निवासस्थानावर दगडफेक केली. त्याआधी निवासस्थानासमोरील काही वस्तूंची तोडफोड करण्यात आली. गडबड-गोंधळ ऐकून छाबडा घराबाहेर आले. त्यानंतर दगडफेक, तोडफोड करणाऱ्यांनी पलायन केले. पळून जाण्याआधी त्यांनी छाबडा यांना जीवे मारण्याची धमकी दिली. छाबडा यांच्या निवासस्थानावरील हल्ल्याची पोलिसांनी तातडीने गंभीर दखल घेतली. तसेच, मुख्य आरोपी प्रियांशू सिंह (वय २५) याच्यासह तिघांना अटक केली. मद्यधुंद अवस्थेत त्यांनी गोंधळ घातल्याचे प्राथमिक चौकशीतून स्पष्ट झाले. सराईत गुन्हेगार असणाऱ्या प्रियांशूवर विविध स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. एका प्रकरणात जामीन मिळावा यासाठी त्याने दाखल केलेला अर्ज काही महिन्यांपूर्वी छाबडा यांनी फेटाळून लावला होता.