पुणे | लाॅरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित तीघे अटक

पुणे ,{प्रभात वृत्तसेवा}- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचा कट पुण्यातील कर्वेनगर भागात रचल्याचे तपासात उघडकीस आले. या प्रकरणात लाॅरेन्स बिष्णोई टाेळीशी संबंधित प्रवीण लोणकरला अटक करण्यात आली होती. मात्र, त्याचा भाऊ शुभम पसार झाला असून, त्याच्या संपर्कात असलेल्या चौघांना मुंबई पोलिसांनी बुधवारी चौकशीसाठी ताब्यात घेतले.
पोलिसांनी सांगितले की, रुपेश मोहोळ, करण साळवे, शिवम मोहोळ अशी अटक आरोपींची नावे नावे आहेत. सिद्दीकी हत्या प्रकरणात पुण्यातून प्रवीण लोणकर, धर्मराज कश्यप, गुरुनील सिंग यांना अटक करण्यात आली.
प्रवीण लोणकर कर्वेनगर भागात डेअरी चालवायचा. प्रवीण आणि त्याचा भाऊ शुभम समाज माध्यमांतून बिष्णोई टोळीतील सराइतांच्या संपर्कात होते. सिद्दीकी हत्या प्रकरणातील आरोपींच्या संपर्कातही प्रवीण आणि शुभम होते.
बिष्णोई टोळीला पिस्तूल पुरविल्याप्रकरणी शुभम याला अकोला पोलिसांनी अटक केली होती. कर्वेनगर भागातून बुधवारी ताब्यात घेण्यात आलेले चौघे जण शुमभच्या संपर्कात होते.
बिष्णोई टोळीने शहरातील एका सराफी पेढीच्या मालकाला जीवे मारण्याची धमकी देऊन दहा कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. हा मेल सिंगापूरवरून आला होता. याप्रकरणाचाही तपास सायबर पोलिसांकडून सुरू आहे. सिद्दीकी खून प्रकरणात मुंबई पोलिसांनी आजपर्यंत नऊ जणांना अटक केली आहे. तसेच लॉरेन्स बिष्णोई गुजरात येथील कारागृहात चौकशीही करण्यात आली आहे.





