अफजल नावाने मुकेश अंबानींना जीवे मारण्याची धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात; मुंबईत चालवतो…

मुंबई – रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख मुकेश अंबानी व त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देणारा फोन आल्याने देशभरात एकच खळबळ उडाली. याप्रकरणी पोलिसांनी आता एका ५६ वर्षीय इसमाला अटक केली आहे. बिष्णू विदू भौमिक असं या आरोपीचं नाव असून तो दक्षिण मुंबईत ज्वेलरीचे दुकान चालवतो अशी प्राथमिक माहिती मिळाली आहे.
आरोपीने अफझल या नावाने रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आठ कॉल करुन मुकेश अंबानी यांना ठार मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी त्याच्यावर डीबी मार्ग पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या कलम 506 (2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
मूळचा त्रिपुरा येथील असलेला बिष्णू विदू भौमिक गेल्या ३० वर्षांपासून मुंबई येथे वास्तव्यास आहे. त्याने आज (१५ ऑगस्ट) रिलायन्स रुग्णालयाच्या लँड लाईन फोनवर धमकीचा फोन केला. सकाळी 10:39 ते दुपारी 12 या कालावधीत त्याने आठ कॉल केल्याची माहिती आहे. आरोपीने या प्रकारचं कृत्य या आधीही केल्याचं पोलीस रेकॉर्डमधून समोर आलं असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, प्राप्त माहितीनुसार आरोपी विवाहित असून त्याला दोन मुलं आहेत. त्याची मानसिक स्थिती देखील स्थिर आहे, त्याला कोणतीच मानसिक समस्या वा आजार नसल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.





