राहुल गांधींच्या जीवाला धोका; पुणे कोर्टात खळबळजनक लेखी माहिती, ‘या’ दोघांचे घेतले नाव

पुणे : लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये मतचोरीचा मुद्दा उपस्थित केल्यामुळे आपल्या जीवाला धोका असल्याची खळबळजनक माहिती काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बुधवारी पुण्यातील विशेष न्यायालयात लेखी स्वरुपात सादर केली. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधातील कथित बदनामीप्रकरणी दाखल खटल्याच्या सुनावणीवेळी राहुल गांधी यांचे वकील मिलिंद पवार यांनी ही माहिती न्यायालयाला दिली.
राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषदेत कर्नाटक आणि महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत बोगस मतदान आणि मतचोरी झाल्याचा गंभीर आरोप केला होता. यासंदर्भात त्यांनी निवडणूक आयोग आणि भाजपावर थेट हल्ला चढवत पुरावे सादर केले होते. या आरोपांमुळे देशभरात ईव्हीएम आणि निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, इंडिया आघाडीनेही याविरोधात निदर्शने केली. मात्र, या प्रकरणामुळे राहुल गांधी यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे त्यांच्या वकिलांनी न्यायालयात नमूद केले.
भाजपा नेत्यांकडून धमकी?
मिलिंद पवार यांनी न्यायालयात सादर केलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, भाजप नेते तरविंदर मारवा यांनी राहुल गांधी यांना नीट वागण्याचा सल्ला देताना, “नाहीतर त्यांच्या आजीचे (इंदिरा गांधी) जे झाले, तेच त्यांचे होईल,” अशी धमकी दिली. तसेच, भाजपाच्या आणखी एका नेत्याने राहुल गांधी यांना दहशतवादी संबोधले आहे. सध्याचे राजकीय वातावरण आणि या खटल्यातील याचिकाकर्ते सत्यकी सावरकर यांचे गोडसे घराण्याशी असलेले संबंध पाहता, राहुल गांधी यांच्या जीवाला धोका असल्याचे लेखी निवेदनात नमूद करण्यात आले आहे. हिंदुत्ववादी जहालमतवाद्यांकडूनही त्यांना धोका असल्याचे त्यांच्या वकिलांनी म्हटले आहे.
निवडणूक आयोगाला प्रत्युत्तर –
राहुल गांधी यांनी मतचोरीच्या आरोपांसंदर्भात निवडणूक आयोगावर गंभीर टीका केली होती. यावर आयोगाने त्यांना शपथपत्र सादर करण्यास सांगितले होते. मात्र, राहुल गांधी यांनी याला प्रत्युत्तर देताना म्हटले, “मी सादर केलेली सर्व माहिती ही निवडणूक आयोगाच्या कागदपत्रांवर आधारित आहे. ती माझी स्वतःची माहिती नाही. मग मी शपथपत्र का देऊ?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सावरकर बदनामीप्रकरणी खटला –
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या कथित बदनामीयुक्त वक्तव्यांमुळे सत्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात पुण्यातील न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला आहे. या खटल्याच्या सुनावणीवेळी राहुल गांधी यांच्या वकिलांनी त्यांच्या जीवाला असलेला धोका न्यायालयाच्या निदर्शनास आणला. या प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पुढील सुनावणींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





