नवी दिल्ली- अलकायदा या दहशतवादी संघटनेच्या नावाने दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये आत्मघाती हल्ल्यांची धमकी देण्यात आली आहे. प्रेषित महंमद यांच्या विषयी भाजप च्या निलंबीत प्रवक्त्याकडून जी आक्षेपार्ह टिप्पणी देण्यात आली होती त्या अनुषंगाने ही हल्ल्याची धमकी देण्यात आली आहे.
याची केंद्रीय सुरक्षा यंत्रणांनी गंभीर दखल घेतली असून मेट्रो, रेल्वे स्थानके आणि बाजारपेठांवर दक्षता बाळगण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सुरक्षा कर्मचाऱ्यांना कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळून येताच संबंधित विभागाला कळवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
6 जून रोजी अलकायदाच्या नावाने हे धमकीचे पत्र आले आहे. धमकीच्या पत्रात अल-कायदाने म्हटले आहे की आम्ही प्रेषितांच्या सन्मानासाठी दिल्ली, मुंबई, उत्तर प्रदेश आणि गुजरातमध्ये आत्मघाती हल्ले करणार आहोत.
आम्ही आमच्या पैगंबरांचा अपमान करणाऱ्यांना मारून टाकू आणि आमच्या प्रेषितांचा अपमान करणाऱ्यांचा नाश करण्यासाठी आम्ही आमच्या शरीरावर आणि आमच्या मुलांच्या शरीरावर स्फोटके बांधून त्यांचा नाश करू अशी धमकीही यात देण्यात आली आहे. भाजपच्या वादग्रस्त प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्यांच्या अनुषंगाने हे प्रकरण उद्भवले आहे.