Pune District : निमगाव म्हाळुंगीत दूषित पाण्याने हजारो मासे मृत
Pune District : कामिनी नदीच्या पाण्याचा वापर परिसरातील नागरिकांकडून शेतीसाठी केला जातो.

शिक्रापूर : निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) येथील कामिनी नदीचे पाणी दूषित झाल्याने हजारो मासे मृत्युमुखी पडल्याची घटना समोर आली आहे. नदीपात्रात मृत माशांचा खच पडल्याने परिसरात दुर्गंधी पसरली असून, नदीच्या पाण्याचा शेतीसाठी वापर तसेच नदीलगतच गावच्या पाणीपुरवठा योजनेची विहीर असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. या प्रकाराची तातडीने चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, परिसरातील काही व्यावसायिकांकडून दूध, रसायने व गटारमिश्रित पाणी कामिनी नदीत सोडले जात असल्याने नदीचे पाणी मोठ्या प्रमाणात दूषित झाले आहे. नदीमध्ये मोठ्या प्रमाणात मासे असून, दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. मृत माशांमुळे नदीकाठच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. कामिनी नदीच्या पाण्याचा वापर परिसरातील नागरिकांकडून शेतीसाठी केला जातो.
तसेच नदीच्या शेजारीच गावच्या पाणीपुरवठा योजनेची विहीर असल्याने दूषित पाण्याचा परिणाम विहिरीच्या पाण्यावर होण्याची भीती ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे शेतीपिकांसह नागरिकांच्या आरोग्यावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने तातडीने पाण्याची तपासणी करून आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे. नदीतील रासायनिक सांडपाणी, पाण्याचे प्रदूषण किंवा पाण्यातील प्राणवायूची कमतरता यामुळे मासे मृत झाले असावेत, असा अंदाज स्थानिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, मासे मृत होण्याचे नेमके कारण पाण्याच्या नमुन्यांची तपासणी केल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे संबंधित विभागाने नदीच्या पाण्याचे नमुने घेऊन त्याची तातडीने तपासणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
तक्रारीनंतरही पुन्हा मासे मृत
नदीतील दूषित पाण्याबाबत ग्रामस्थांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सुमारे दोन महिन्यांपूर्वी तहसीलदार व आरोग्य विभागाच्या माध्यमातून नदीच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले होते. संबंधितांना आवश्यक सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, आता पुन्हा मोठ्या प्रमाणात मासे मृत झाल्याने प्रशासनाच्या उपाययोजनांबाबत ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त होत आहे. या प्रकरणाचा वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे ग्रामपंचायत अधिकारी गुलाब नवले यांनी सांगितले.





