Pune District : तांबडेमळा ग्रामपंचायतीला स्वतःच्या इमारतीसाठी गायरानची प्रतीक्षा!
Pune District : ग्रामपंचायतीच्या जुन्या इमारतीची जागा एक खाजगी व्यक्तीची होती. त्या जागेवरच त्यावेळी ग्रामपंचायतीची ईमारत बांधण्यात आली.

मंचर : तांबडेमळा (ता.आंबेगाव) ग्रामपंचायतीचे कार्यालय मराठी शाळेच्या खोलीत चालू आहे.नवीन इमारतीसाठी सहा गुंठे गायरान जागा उपलब्ध असतानाही प्रशासकीय परवानगीअभावी बांधकाम रखडले आहे.गेल्या अडीच वर्षांपासून तलाठ्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सातत्याने पाठपुरावा करूनही प्रस्ताव लालफितीत अडकला असल्याने ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.
ग्रामपंचायतीच्या जुन्या इमारतीची जागा एक खाजगी व्यक्तीची होती. त्या जागेवरच त्यावेळी ग्रामपंचायतीची ईमारत बांधण्यात आली. कालातराने इमारत धोकादायक झाल्याने गेल्या काही वर्षापासून ग्रामपंचायतीचे कामकाज सुरक्षेतेच्या कारणास्तव मराठी शाळेच्या एक खोलीत सद्यस्थितीत चालू आहे. परंतु ग्रामपंचायतीच्या कामकाजामुळे शालेय वातावरणावर त्याचा परिणाम होत आहे. जुन्या जागेवर ग्रामपंचायतीची इमारत मोडकळीस आली तरी ती जागा खाजगी व्यक्तीची असल्याने ती जागा तो मागत आहे. त्यासाठी नवीन जागेत ग्रामपंचायतीची ईमारत उभी राहावी.
यासाठी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी प्रयत्नशील आहे.ग्रामपंचायतीने विविध सार्वजनिक व विकासकामांसाठी सुमारे १२ एकर जमीन उपलब्ध करून दिली आहे.शासकीय रुग्णालय, जिल्हा दूध संघ,शेतमाल प्रक्रिया संस्था, मंचर एसटी आगार, स्मशानभूमी आदी सार्वजनिक उपक्रमांसाठीही जागा देण्यात आली. मात्र, आता स्वतःच्या कार्यालयासाठी सहा गुंठे गायरान जागेची परवानगी मिळविताना ग्रामपंचायतीला शासकीय कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागत आहेत.जागा उपलब्ध असल्याने ग्रामपंचायतीने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून प्रस्ताव तलाठी, मंडलाधिकारी, तहसीलदार, प्रांताधिकारी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविला.
मात्र, प्रत्येक टप्प्यावर काही ना काही त्रुटी काढून प्रस्ताव परत पाठविला जात असल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्रुटींची पूर्तता केल्यानंतरही पुन्हा नव्या त्रुटी काढल्या जात असल्याने पदाधिकारी हैराण झाले आहेत.विशेष म्हणजे जिल्हाधिकारी कार्यालयाने चार महिन्यांपूर्वी काही कागदपत्रांच्या पूर्ततेबाबत मंचर प्रांत कार्यालयाला पत्र पाठविले होते. हे पत्र ग्रामपंचायतीला मिळालेच नव्हते. पदाधिकाऱ्यांनी प्रांत कार्यालयात चौकशी केल्यानंतर ते पत्र मिळाले. त्यामुळे चार महिन्यांपासून पत्र प्रांत कार्यालयातच पडून असल्याचे समोर आले.कागदावर वजन न ठेवल्यामुळे जाणीवपूर्वक हेलपाटे मारावे लागतात, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
“ग्रामपंचायतीकडे इमारतीसाठी जागा उपलब्ध असून आवश्यक कागदपत्रांची पूर्तताही केली आहे. अडीच वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. प्रशासनाने आता त्रुटींची पूर्तता करून परवानगी द्यावी, हीच ग्रामस्थांची अपेक्षा आहे.
-प्राजक्ता विजय तांबडे,सरपंच तांबडेमळा.





