Pune District : वाल्हे परिसरात उसावर पायरिला तुडतुड्यांचे संकट
Pune District : या किडीच्या प्रादुर्भावामुळे उसाची पाने काळ्या राखेने माखल्यासारखी दिसत आहेत. पानाच्या खालच्या बाजूला असलेली पांढरट-पिवळसर पिले पानातील रस शोषून घेतात आणि त्या बदल्यात मधासारखा चिकट पदार्थ सोडतात.

वाल्हे : ऊस पट्ट्यात अग्रेसर मानल्या जाणाऱ्या वाल्हे (ता. पुरंदर) परिसरात या वर्षी निसर्गाच्या अवकृपेसोबतच किडींचे नवे संकट ओढावले आहे. मागील काही वर्षांपासून लोकरी मावा आणि हुमणी अळीने हैराण झालेल्या शेतकऱ्यांपुढे आता उसावरील पायरिला (तुडतुडे) या किडीचे गंभीर आव्हान उभे ठाकले आहे. पावसाची ओढ आणि गेल्या दोन महिन्यांपासून असलेले ढगाळ व दमट वातावरण किडीच्या वाढीस पोषक ठरल्याने उसाची पिके धोक्यात आली असून शेतकरी वर्ग तीव्र चिंताग्रस्त झाला आहे.
या किडीच्या प्रादुर्भावामुळे उसाची पाने काळ्या राखेने माखल्यासारखी दिसत आहेत. पानाच्या खालच्या बाजूला असलेली पांढरट-पिवळसर पिले पानातील रस शोषून घेतात आणि त्या बदल्यात मधासारखा चिकट पदार्थ सोडतात. या पदार्थावर कॅपनोडियम नावाची काळी बुरशी वाढून संपूर्ण पान व्यापून टाकते. यामुळे पानांची अन्न तयार करण्याची (प्रकाश संश्लेषण) प्रक्रिया मंदावते. परिणामी उसाची वाढ खुंटून कांड्या बारीक राहतात आणि साखरेच्या प्रमाणात (रिकव्हरी) मोठी घट होते, अशी माहिती स्थानिक ऊस उत्पादक शेतकरी नितीन पवार यांनी दिली.
सध्या ऊस पूर्ण वाढलेला आणि उंच असल्याने पारंपरिक फवारणी यंत्राच्या माध्यमातून शेतात जाऊन औषध फवारणे अशक्य बनले आहे. मजुरांकडून फवारणी केल्यास ऊस मोडून नुकसान होते, तसेच कीटकनाशकांमुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची भीती आहे. यावर पर्याय म्हणून साखर कारखाना प्रशासनाने आणि कृषी विभागातर्फे सवलतीच्या दरात ड्रोन फवारणी यंत्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी मुकदमवाडी व वाल्हे परिसरातील बळीराजाने केली आहे.
किडीची लक्षणे कशी ओळखाल?
पानांखालील कीड: उसाच्या पानांच्या खालच्या बाजूला पांढुरके, पिवळसर तुडतुडे आणि त्यांची पिले दिसतात.
तेलकट डाग: पानांवर चिकट व तेलकट डाग निर्माण होतात.
काळी बुरशी: चिकट पदार्थावर काळी बुरशी जमल्याने हाताला काळे लागते.
शेताचे स्वरूप: लांबून पाहिल्यास संपूर्ण ऊसाचे शेत काळे-करडे दिसू लागते.





