Pune : देशात विचारशून्यता ही आपली समस्या

पुणे : देशात विचारभिन्नता ही नाही, तर विचारशून्यता ही समस्या आहे. आपली कशासोबत बांधिलकी आहे, हे लोकांना माहिती असले पाहिजे. पक्षात आणि संघटनेमध्ये कार्यकर्त्यांचा माणूस म्हणून विचार करायला हवा. जो केला जात नाही. अलीकडे सत्ता येईल तिकडे नेते पळतात. सत्ता गेली की तिथून दुसरीकडे उड्या मारतात. जीवनात पैसा हा महत्त्वाचा असला, तरी सर्वस्व नाही. त्याचप्रमाणे आरोग्यालाही महत्त्व द्यायला हवे, असे मत केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.
मराठा सेवा संघ व युगनायक पुरुषोत्तम खेडेकर अमृतमहोत्सव गौरव समिती यांच्या वतीने मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर अमृतमहोत्सव अभिष्टचिंतन सोहळ्यात गडकरी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष विजय घोगरे, तर प्रमुख पाहुणे माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, पुरुषोत्तम खेडेकर, आमदार रेखा खेडेकर, माधवराव पाटील शेळगावकर, ज्येष्ठ कवी इंद्रजित भालेराव, कर्नाटकमधील आमदार डॉ. मारोतराव मुळे, माजी आयपीएस अधिकारी विक्रम बोके, व्यंकटराव गायकवाड, हेमंतकुमार देशमुख, विठ्ठलराव गायकवाड, गिरीश जोशी, आमदार शंकर जगताप, राजेंद्र पवार, रवींद्र माळवदकर, माजी आमदार विलास लांडे, राजेंद्र डुबल उपस्थित होते. याप्रसंगी मदन पाटील लिखित ‘क्रांतिपुरुष पुरुषोत्तम खेडेकर’ या गौरव ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.
समाजातील अस्पृश्यता, जातीयता, विषमता संपुष्टात आली पाहिजे. कारण तुमची गुणवत्ताच तुम्हाला श्रेष्ठ बनवते, असे सांगत नितीन गडकरी म्हणाले, गुणवत्ता ही ज्ञानातून मिळते. भारताला विश्वगुरू बनायचे असेल, तर ज्ञान महत्त्वाचे आहे. मी माझ्या आई- वडिलानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना मानतो. त्यांच्यासारखा आदर्श राजा दुसरा कोणी नाही. सर्वधर्म समभाव असणारे ते एकमेव राजे होते. सत्काराला उत्तर देताना पुरुषोत्तम खेडेकर यांनी शासकीय अधिकारी म्हणून काम करताना आलेल्या अडचणी,
त्यावर मात करून सामाजिक संघटन कसे वाढविले आणि नोकरीत असताना तरुणांना रोजगाराच्या संधी कशी उपलब्ध करून दिल्या, याची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक गंगाधर बनबरे, सूत्रसंचालन स्नेहा खेडेकर यांनी केले. सौरभ खेडेकर, संतोष शिंदे, उत्तम कामठे, अविनाश मोहिते, चंद्रशेखर घाडगे, मनोज गायकवाड, अविनाश घोडके, प्रशांत धुमाळ यांनी कार्यक्रम यशस्वी केला.





