“ठाकरे गटात जाऊ इच्छिणाऱ्यांना ईडीकडून धमकावले जाते आहे’ – संजय राऊत

Sanjay Raut – शिवसेनच्या ठाकरे गटात येऊ इच्छिणाऱ्यांना ईडीमार्फत धमक्या दिल्या जात आहेत असा आरोप ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ते म्हणाले की, शिवसेनेत (यूबीटी) सामील होऊ इच्छिणाऱ्या सर्व बड्या नेत्यांना त्यांच्या घरी ईडीने नोटिसा पाठवल्या आहेत. नोटिसा पाठवल्या जातात आणि त्यांना शिवसेनेच्या जवळ कुठेही जाऊ नका, अशी धमकी दिली जाते, असे राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
शिवसेनेबाबत सभापतींनी (राहुल नार्वेकर) दिलेला निर्णय पूर्णपणे बेकायदेशीर होता. आम्ही भारतीय निवडणूक आयोगाला जे कागदोपत्री कळवले होते त्याचे सर्व पुरावे आमच्याकडे होते. आम्ही सर्व माहिती जनतेला दिली होती.त्यांनी जो मुखवटा घातला आहे त्याचा पर्दाफाश केला आहे.
त्यानंतर ते संतप्त झाले आणि दुसऱ्या दिवसापासून आमच्या लोकांना ईडी आणि आयटीकडून नोटिसा मिळू लागल्या, असे राऊत म्हणाले. दरम्यान नार्वेकरांच्या निकालला शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून त्या आव्हान याचिकेवर येत्या २२ तारखेला निणॅय अपेक्षीत आहे.
शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांचे प्रतिनिधित्व करणारे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती जेबी पार्डीवाला आणि मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाचा उल्लेख केला. जून २०२२ मध्ये विभाजन झाल्यानंतर एकनाथ शिंदे गटाला ‘खरी शिवसेना’ म्हणून मान्यता देण्याच्या महाराष्ट्र विधानसभेच्या सभापतींच्या आदेशाला ठाकरे गटाने आव्हान दिले.





