गणेशोत्सवाचे नियम न पाळणाऱ्यांना भरावा लागणार मोठा ‘दंड’; जाणून घ्या – काय आहेत नियम ?

नागपूर – गणेशोत्सव मंडळाने प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेशमूर्तींबाबतचे नियम मोडल्यास त्यांना दंड करण्याची तरतूद आहे. मात्र, हा दंड २ ते ३ हजार रुपये नसावा. तो चांगला चिमटा घेणारा असावा. जलप्रदूषणासाठी लावता येणाऱ्या दंडाची माहिती घ्या व नियम मोडणाऱ्या गणेशोत्सव मंडळांवर चांगला जरब बसेल असा दंड आकारा, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नागपूर महापालिकेच्या प्रशासनाला दिले आहेत.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती पाण्याच्या नैसर्गिक स्रोतांमध्ये विसर्जित केल्यानंतर उद्भवणाऱ्या धोके लक्षात घेत खंडपीठाने स्वत:हून जनहित याचिका दाखल करून घेतली आहे. त्यावर न्यायमूर्ती नितीन सांबरे आणि न्यायमूर्ती अभय मंत्री यांच्या समक्ष सुनावणी झाली.
गेल्या सुनावणीवेळी राज्य सरकारने सांगितले होते की, नैसर्गिक जलस्रोतांमध्ये मूर्तीचे विसर्जन प्रतिबंधित करण्याबाबत केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने (सीपीसीबी) जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले आहे. त्यानुसार, मनपाची काय तयारी आहे याची माहिती न्यायालयाने घेतली.
या वेळी न्यायालयाने आदेश दिले की, ‘पीओपीबाबतच्या मार्गदर्शक सूचनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना प्रसिद्धी द्या. तसेच पीओपी आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी अधिक सजग राहावे. पर्यावरणपूरक उत्सव साजरा न करणाऱ्या व नियम मोडणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर दंड आकारा. मात्र, हा दंड साधासुधा नसावा. जलप्रदूषणासाठी लावता येणाऱ्या दंडाची माहिती घ्या व नियम मोडणाऱ्या गणेशोत्सव मंडळांवर चांगला जरब बसेल असा दंड आकारा, असे आदेश न्यायालयाने दिले. या खटल्यात न्यायालयीन मित्र म्हणून ॲड. श्रीरंग भांडारकर यांनी व शासनातर्फे वरिष्ठ विधिज्ञ एस. के. मिश्रा यांनी बाजू मांडली.
हे आहेत नियम –
-पीओपी, प्लास्टिक, थर्माकोल, कृत्रिम रंगांपासून बनवलेल्या सजावटीच्या वस्तू टाळा
-मूर्तिकारांनी शाडू माती, कागदी लगदा यांसारख्या पारंपरिक साहित्याचा वापर करावा
-पर्यावरणपूरक मूर्तीच्या उजव्या खांद्याच्या मागील बाजूस हिरवे वर्तुळ लावून चिन्हांकित करावे
-हानिकारक रंगांऐवजी नैसर्गिक रंगांचा वापर करून मूर्ती बनवावी
-मूर्ती उत्पादन, विक्री आणि विल्हेवाट यासंदर्भात सर्व शासकीय नियमांचे पालन करावे
-भक्तांनी केवळ पर्यावरणपूरक मूर्ती खरेदी करावी. महानगरपालिकेने बांधलेल्या कृत्रिम तलावांमध्येच मूर्तीचे विसर्जन करावे
-ध्वनी प्रणालीचे प्रमाण मर्यादित ठेवून प्रदूषण नियमांचे पालन करावे
-प्लास्टिक प्रदूषण रोखण्यासाठी प्लास्टिकची सजावट करणे कटाक्षाने टाळावे





