Pune : यंदाचा पुणे पुस्तक महोत्सव विश्वविख्यात होईल- आ. चंद्रकांत पाटील

पुणे : लेखन, वाचन, चिंतन, संशोधन ही समाजाला सकारात्मक करणारी क्षेत्रे आहेत. पुणे या क्षेत्रांची प्रयोगशाळा असून, संपूर्ण जग या शहराचे अनुकरण करते. पुण्याचा गणेशोत्सव जगभर प्रसिद्ध आहे, तसा यंदाचा पुणे पुस्तक महोत्सवही विश्वविख्यात होईल, असा विश्वास राज्याचे माजी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने येत्या १४ ते २२ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणावर ‘पुणे पुस्तक महोत्सव’ रंगणार आहे. या महोत्सवाच्या नियोजनाची व्यापक बैठक फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटर येथे पार पडली. या प्रसंगी चंद्रकांत पाटील बोलत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, अभिनेते-लेखक प्रवीण तरडे, महोत्सवाचे संयोजक राजेश पांडे, ‘एनबीटी’चे सहायक संचालक (प्रदर्शन) मयांक सुरोलिया, संयोजन समितीचे सदस्य बागेश्री मंठाळकर, प्रसेनजीत फडणवीस, प्रा. संजय चाकणे, डॉ. आनंद काटीकर आदी उपस्थित होते.
आमदार पाटील म्हणाले, ‘गत वर्षीच्या तुलनेत यंदाचा ‘पुणे पुस्तक महोत्सव’ चौपट मोठा होणार असून, त्याद्वारे पुस्तक प्रदर्शनांच्या जगतात नवा विश्वविक्रम प्रस्थापित होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार असून, त्यांनी नागपूर येथेही अशाच पुस्तक महोत्सवाच्या आयोजनाची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पुणे पुस्तक महोत्सवाचे अनुकरण सर्व शहरांना करावेसे वाटत आहे,’ असे समाधानही पाटील यांनी व्यक्त केले.
पांडे म्हणाले, “पुणे पुस्तक महोत्सव’ हा पुणेकरांचा महोत्सव असून, त्यामध्ये प्रत्येकाने सहभाग नोंदवून संघशक्तीच्या जोरावर ही वाचन चळवळ यशस्वी करावी. ‘पुणे पुस्तक महोत्सवा’च्या भव्य प्रवेशद्वाराचे येत्या १० डिसेंबरला मान्यवरांच्या हस्ते अनावरण केले जाणार आहे, तसेच येत्या ११ डिसेंबरला ‘शांतता पुणेकर वाचत आहेत’ हा उपक्रम होणार असून, त्यामध्ये प्रत्येकाने दहा पुणेकर वाचकांना जमवून पुस्तकांचे वाचन करावे. शहराचे प्रमुख चौक, महाविद्यालये-शाळा, महापालिकेसह शासकीय कार्यालय, मेट्रो या ठिकाणी हा उपक्रम करून अधिकाधिक वाचकांना पुस्तकांशी जोडण्याचा प्रयत्न केला जाणार आहे,’ अशी माहितीही त्यांनी दिली.




