Navratri festival: यंदाच्या नवरात्रोत्सवाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड; अनेकांनी घेतली एआयची मदत
Navratri Festival: साहित्याची यादी बनविण्यापासून नियोजनापर्यंत कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

पिंपरी – नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी घरोघरी घटस्थापना झाली आहे. घटस्थापनेसाठी आवश्यक असणारे साहित्य, पूजेची पद्धत आणि पूजेचे नियोजन याबाबत माहिती मिळविण्यासाठी अनेकांकडून कृत्रिम बुद्धिमत्तेची (एआय) मदत घेतली जात आहे. त्यामुळे यंदाच्या नवरात्रोत्सवात पारंपरिक धार्मिक विधींसोबत आधुनिक तंत्रज्ञानाचीही जोड पाहायला मिळत आहे.
घटस्थापनेसाठी लागणाऱ्या साहित्याची यादी तयार करणे, पूजेसाठी आवश्यक वस्तूंची माहिती मिळविणे, पूजेचा क्रम समजून घेणे तसेच ऐनवेळी एखादी वस्तू राहू नये यासाठी अनेकजण एआयचा वापर करत आहेत. मोबाईलवर काही सूचना दिल्यानंतर साहित्याची यादी तयार होत असल्याने तयारी करणे सोपे होत असल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
नवरात्रोत्सवात अनेक घरांमध्ये घटस्थापना केली जाते. त्यासाठी धान्य, नारळ, फुले, पूजेचे साहित्य आणि इतर आवश्यक वस्तूंची व्यवस्था करावी लागते. दैनंदिन धावपळीच्या जीवनात कोणते साहित्य घ्यायचे, किती प्रमाणात घ्यायचे आणि पूजेची तयारी कशी करायची, यासाठी एआयचा आधार घेतला जात आहे.
विशेष म्हणजे, पहिल्यांदाच घटस्थापना करणाऱ्या व्यक्तींना साहित्याची प्राथमिक यादी तयार करण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होत आहे. मात्र पूजेची पद्धत आणि आवश्यक साहित्य यामध्ये कुटुंबपरंपरा, प्रादेशिक रीतिरिवाज आणि धार्मिक मान्यतांनुसार फरक असू शकतो. त्यामुळे एआयकडून मिळालेल्या माहितीची जाणकारांकडून खात्री करून घेण्यावरही भर दिला जात आहे.
एकीकडे नवरात्रोत्सवातील धार्मिक परंपरा कायम आहेत, तर दुसरीकडे त्यासाठीच्या तयारीत तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे. त्यामुळे घटस्थापनेच्या साहित्याची यादी बनविण्यासाठी एआयचा घेतला जाणारा आधार हा बदलत्या जीवनशैलीचे उदाहरण ठरत आहे.
Slight drop in temperature: ढगाळ वातावरणामुळे तापमानात किंचित घट





