Navratri Festival : आई एकविरा देवी देवस्थान नवरात्रोत्सवासाठी सज्ज; भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी मंदिर पहाटे ४ ते रात्री ११ वाजेपर्यंत खुले
Navratri Festival : दुर्गाष्टमी आणि महानवमीला २४ तास दर्शनाची सुविधा

कार्ला – महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला-बेहेरगाव गडावरील आई एकविरा देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण झाली आहे. भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे, यासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट सज्ज झाला आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात दररोज पहाटे ४ ते रात्री ११ वाजेपर्यंत मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे. तर दुर्गाष्टमी आणि महानवमी या दोन दिवशी मंदिर २४ तास खुले ठेवण्यात येणार असल्याची माहिती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे यांनी दिली.
आई एकविरा देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला आज (दि. ११) घटस्थापनेने सुरुवात होणार आहे. घटस्थापनेचा पहिला दिवस रविवार असल्याने गडावर मोठ्या संख्येने भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. ही गर्दी लक्षात घेऊन पहाटेच देवीचा अभिषेक, पूजा आणि आरती करण्यात येणार आहे. त्यानंतर विश्वस्त मंडळाच्या हस्ते घटस्थापना केली जाणार आहे.
नवरात्रोत्सवातील ललित पंचमी, महालक्ष्मी पूजन, दुर्गाष्टमी आणि महानवमी हे महत्त्वाचे धार्मिक दिवस असणार आहेत. गुरुवारी (दि. १५) ललित पंचमी, रविवारी (दि. १८) महालक्ष्मी पूजन, सोमवारी (दि. १९) दुर्गाष्टमी, तर मंगळवारी (दि. २०) पहाटे महानवमी होम होणार आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गडावर सुरू असलेल्या विविध विकासकामांमुळे भाविकांच्या प्रवासात सुलभता येणार आहे. कार्ला फाटा ते गडाच्या पायथ्यापर्यंत पथदिवे सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे रात्री तसेच पहाटे गडावर येणाऱ्या भाविकांना त्याचा फायदा होणार आहे.
गडाच्या पायथ्यापासून पार्किंगपर्यंतच्या पायऱ्यांचे काम पूर्ण झाले आहे. पुढील टप्प्यातील काही कामे अद्याप शिल्लक असली, तरी भाविकांना गडावर जाण्यासाठी आणि परत खाली येण्यासाठी अडथळा निर्माण होणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. गडावर तसेच पार्किंग परिसरात स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध आहे. दर्शनासाठी रेलिंगमध्ये रांगेत उभे राहणाऱ्या भाविकांसाठी पंखे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
खासदार तथा श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त सुरेश म्हात्रे यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यक्ष दीपक हुलावळे, वरिष्ठ उपाध्यक्ष मारुती देशमुख, उपाध्यक्ष सागर देवकर, सचिव नवनाथ देशमुख, सहसचिव महेंद्र देशमुख, खजिनदार तथा पुजारी संजय गोविलकर, सहखजिनदार विकास पडवळ आणि विश्वस्त अर्चना देवकर यांच्यासह विश्वस्त मंडळ भाविकांच्या स्वागतासाठी आणि सुलभ दर्शनासाठी कार्यरत राहणार आहे.
मंदिर परिसर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली
नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत मंदिर परिसरात आठ दिवस सप्तशृंगी पाठाचे पठण केले जाणार आहे. तसेच संपूर्ण मंदिर परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली ठेवण्यात आला आहे. भाविकांना दर्शन घेताना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी विश्वस्त मंडळाचे पदाधिकारी आणि सर्व सदस्य उत्सवाच्या काळात गडावर उपस्थित राहून सेवा देणार आहेत.
Manchar : हुतात्मा बाबू गेनू स्मारक दुरवस्थेविरोधात प्रतिष्ठान आक्रमक





