यंदाचा दिशा परिवार सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार ‘दादाची शाळा’ भरवणाऱ्या अभिजित पोखरणीकरांना

पुणे – दिशा परिवारतर्फे दरवर्षी एका प्रेरणादायी सामाजिक कार्यकर्त्याला “सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार” देऊन सन्मानित करण्यात येते. या पुरस्कारामागची भूमिका ही केवळ कोणाला पुरस्कार देतो आणि त्याचा उदोउदो करणे एवढ्यावर सीमित नसून, समाजात खराखुरा बदल घडवून आणणाऱ्या व्यक्तींच्या कार्याची दखल घेणे आणि त्यांना समाजासमोर आणणे हा आमचा मुख्य उद्देश आहे.
समाजात सकारात्मक परिवर्तन घडवण्यासाठी झटणाऱ्या व्यक्तींच्या कार्यातून इतरांनाही प्रेरणा मिळावी, अशी आमची भावना आहे. म्हणूनच दिशा परिवार या पुरस्काराद्वारे अशी कार्यकर्ती व्यक्तिमत्वं समाजासमोर आणत आहे, ज्यांनी निस्वार्थपणे आणि सातत्याने समाजहितासाठी कार्य केले आहे. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह व ₹२५,०००/- रोख रक्कम असे आहे.
२०२५ सालचा दिशा परिवार सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार हा अभिजित पोखरणीकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. त्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून कष्टकरी, वंचित व रस्त्यावर वस्तू विकून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबातील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचे अतुलनीय कार्य सुरू केले आहे. दरम्यान, यंदाचा हा सन्मान प्रदान सोहळा २४ ऑगस्ट २०२५ रोजी, दुपारी, एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ, पुणे येथे पार पडणार आहे.
अभिजित पोखरणीकर आणि ‘दादाची शाळा’
समाजात शिक्षणापासून वंचित राहिलेली अनेक मुले आजही रस्त्यांवर किंवा पुलाखाली दिवस काढतात. त्यांच्या हातात खेळणी किंवा पुस्तके नसून, विक्रीसाठी असलेल्या वस्तू असतात. पण याच झगडणाऱ्या आयुष्यात शिक्षणाची उमेद निर्माण करणारा एक युवक म्हणजे अभिजित पोखरणीकर.
पुण्यातील अभिजित यांनी ‘दादाची शाळा’ या उपक्रमाची सुरुवात केली. हा उपक्रम म्हणजे केवळ शिक्षणप्रदान नव्हे, तर मुलांमध्ये आत्मविश्वास, सामाजिक जाणिवा आणि स्वप्न पाहण्याची हिंमत जागवण्याचा प्रयत्न आहे. रस्त्यांवर आणि पुलाखाली संध्याकाळी भरवली जाणारी ही शाळा, या मुलांसाठी शिक्षणाचे दार उघडणारी पहिली पायरी ठरली आहे.
अभिजितने सुरुवातीला काही स्वयंसेवकांच्या मदतीने शिक्षण देण्यास सुरुवात केली. हळूहळू ही चळवळ मोठी होत गेली. ‘एज्युकेअर ट्रस्ट’च्या माध्यमातून हा उपक्रम अधिक शिस्तबद्ध आणि व्यापक झाला. पुण्यातील विविध भागांमध्ये—मार्केट यार्ड, कात्रज, झेड ब्रिज, हडपसर— अशा अनेक ठिकाणी आजही दादाची शाळा भरते.
आज ‘दादाची शाळा’तून १७०० हून अधिक मुले शिकली आहेत, आणि जवळपास ७५० मुले नियमितपणे शिक्षण घेत आहेत. केवळ पुस्तकी शिक्षणच नव्हे, तर या शाळांमध्ये मुलांना चित्रकला, खेळ, तंत्रज्ञान, व्यक्तिमत्त्व विकास यांचीही ओळख करून दिली जाते.
अभिजित यांचा हा उपक्रम म्हणजे एक खऱ्या अर्थाने देशसेवा करणारा प्रयत्न आहे. शिक्षणाच्या माध्यमातून समाजघटकांना मुख्य प्रवाहात आणण्याची ही चळवळ प्रेरणादायी आहे. समाजात सकारात्मक बदल घडवण्याची जाणीव आणि कृतीशीलता यांचा सुंदर मिलाफ म्हणजेच – ‘दादाची शाळा’





