Rahul Gandhi – बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या विजयावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी तीव्र शब्दांत टीका केली आहे. भाजपचा हा विजय म्हणजे जनादेशाची चोरी असून भारतीय लोकशाही नष्ट करण्याच्या मोहिमेतील हे एक मोठे पाऊल आहे, असे प्रतिपादन त्यांनी मंगळवारी केले. निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला (टीएमसी) पत्कराव्या लागलेल्या पराभवावर गांधी यांनी भाष्य केले. विशेष म्हणजे, विरोधी पक्षांच्या पराभवाचा आनंद साजरा करणाऱ्या आपल्याच पक्षातील काही नेत्यांना आणि इतरांना त्यांनी खडेबोल सुनावले. (Rahul Gandhi ) Rahul Gandhi : “भाजपचा हा विजय म्हणजे जनादेशाची चोरी…”; टीएमसीच्या पराभवावर राहुल गांधींची आक्रमक भूमिका आपल्या अधिकृत सोशल मिडिया अकाउंटवरुन केलेल्या एका पोस्टमध्ये राहुल गांधी म्हणाले, काँग्रेसमधील काही लोक आणि इतर जण टीएमसीच्या पराभवाचा आनंद साजरा करत आहेत. त्यांनी हे स्पष्टपणे समजून घेतले पाहिजे की, आसाम आणि बंगालचा जनादेश चोरणे हे भारतीय लोकशाही संपवण्यासाठी भाजपने उचललेले मोठे पाऊल असल्याचे त्यांनी पोस्टमध्ये लिहिले आहे. राहुल गांधी यांनी पुढे आवाहन केले की, सध्याच्या परिस्थितीत सर्वांनी क्षुद्र राजकारण बाजूला ठेवले पाहिजे. हा केवळ एका पक्षाचा किंवा दुसऱ्या पक्षाचा प्रश्न नाही, तर हा संपूर्ण भारताचा आणि देशाच्या लोकशाहीचा प्रश्न आहे, असे त्यांनी ठामपणे मांडले. सोमवारी जाहीर झालेल्या निकालांनुसार, भाजपने बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला सत्तेवरून पायउतार केले असून, आसाममध्ये सलग तिसऱ्यांदा आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या निकालांमुळे विरोधकांमध्ये चिंतेचे वातावरण असताना राहुल गांधी यांनी भाजपविरोधात एकत्रित लढण्याचे संकेत दिले आहेत.