‘या’ मुस्लिम देशाचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय ; १४ वर्षांनंतर केले खुल्या हातांनी स्वागत

Pakistan-Kuwait Visa Ban। कुवेतने २०११ मध्ये सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानसह अनेक देशांवर व्हिसा बंदी घातली होती. या बंदीचे कारण प्रादेशिक अस्थिरता आणि दहशतवाद मानले जात होते, परंतु आता एका नवीन अध्यायाला सुरुवात झाली आहे. कारण कुवेत सरकारने ही बंदी तात्काळ प्रभावाने उठवली आहे, ज्यामुळे पाकिस्तानातील नागरिकांसाठी रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आता पाकिस्तानी नागरिक वर्क व्हिसा, फॅमिली व्हिजिट, बिझनेस व्हिसा आणि टुरिस्ट व्हिसासाठी अर्ज करू शकतात.
आरोग्य क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी आणि कामगारांची मागणी पूर्ण करण्यासाठी कुवेत सरकार सध्या परदेशी कामगारांकडे पाहत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, १२०० पाकिस्तानी परिचारिकांची भरती करण्याची योजना आखण्यात आली आहे. यासाठी कुवेतने व्हिसा प्रक्रिया सोपी आणि जलद केली आहे. आयटी, बांधकाम, सामान्य कामगार आणि इतर क्षेत्रात केवळ पाकिस्तानी नागरिकांसाठी नोकऱ्या उघडल्या जात आहेत.
पाकिस्तानची अर्थव्यवस्था Pakistan-Kuwait Visa Ban।
पाकिस्तानची अर्थव्यवस्था गंभीर संकटातून जात आहे. बेरोजगारी शिगेला पोहोचली आहे, डॉलर्सची मोठी कमतरता आहे. असे सगळे घडत असताना आयएमएफसोबत देखील कर्जासाठी वाटाघाटी सुरू आहेत. अशा परिस्थितीत कुवेतचे हे पाऊल पाकिस्तान सरकारसाठी दिलासा देण्यासारखे आहे. २०११ मध्ये कुवेतने पाकिस्तान, इराण, सीरिया, अफगाणिस्तान आणि येमेन सारख्या देशांच्या नागरिकांवर व्हिसा निर्बंध लादले.
यामागील मुख्य कारणे म्हणजे दहशतवाद आणि अतिरेकीवादाची वाढती भीती, आखाती देशांमध्ये राजकीय अस्थिरता, स्थलांतरित कामगार आणि स्थानिक नागरिकांमधील सामाजिक तणाव आणि अंतर्गत सुरक्षा आणि संसाधनांचे संरक्षण. देशाची सुरक्षा आणि सामाजिक संतुलन राखण्यासाठी हे निर्णय घेण्यात आल्याचे कुवेतने स्पष्ट केले होते.
कुवेत-पाकिस्तान संबंधांना नवी दिशा Pakistan-Kuwait Visa Ban।
कुवेत आणि पाकिस्तानमधील आर्थिक सहकार्य आणि धोरणात्मक संबंध मजबूत करण्याच्या दिशेने व्हिसा बंदी उठवणे हे एक मोठे पाऊल मानले जात आहे. यामुळे रोजगार आणि रेमिटन्सद्वारे पाकिस्तानला आर्थिक बळकटी मिळेल. पाकिस्तानी कामगार कुवेतमध्ये कायमस्वरूपी काम करू शकतील, ज्यामुळे देशासाठी डॉलर्सचा ओघ वाढेल. कुवेतला कमी खर्चात कुशल कामगार मिळू शकतील, ज्यामुळे त्यांच्या प्रकल्पांना गती मिळेल.





