गुवाहाटीला ‘हा’ आमदार हॉटेलवरून मारणार होता उडी; शिंदेंच्या आमदारांनी सांगितला थरारक किस्सा

Mumbai : महाराष्ट्राच्या राजकारणातील २०२२ च्या बंडानंतरचा गुवाहाटी अध्याय आजही चर्चेत आहे. त्या काळात शिवसेना (शिंदे गट) नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार गुवाहाटीतील रेडिसन ब्ल्यू हॉटेलमध्ये दडले होते. या पार्श्वभूमीवर नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर यांचा एक धक्कादायक प्रसंग उघडकीस आला आहे. हा किस्सा खुद्द मंत्री संजय शिरसाट यांनी सांगितला आणि सभागृहात एकच हश्या पिकला
शिरसाट म्हणाले, “आम्ही गुवाहाटीला पोहोचलो तेव्हा बालाजी कल्याणकर जेवणही घेत नव्हते. मी त्यांना समजावले, ‘बालाजी, जेवा, काही होणार नाही, आपण एकत्र आहोत.’ पण ते ऐकायलाच तयार नव्हते. उलट ते म्हणाले, ‘मी वर जाऊन हॉटेलवरून उडी मारतो!’ आम्ही एकेक आमदार गोळा करण्यात हैराण होतो. आमची संख्या पूर्ण आहे की नाही, याचीच चिंता होती. पण बालाजी जीव देण्याची भाषा करू लागले!”
हा प्रसंग इतका तणावपूर्ण होता की, शिरसाट आणि इतरांनी तातडीने दोन विश्वासू माणसे कल्याणकर यांच्यामागे लावली. त्यांना सतत समजावत राहिले, “काहीही करू नका, शिंदे साहेब तुमच्यासोबत आहेत.” अखेर कल्याणकर शांत झाले. आज मात्र ते शिंदे साहेबांच्या अत्यंत जवळचे समजले जातात आणि पूर्णपणे खुश आहेत.
शिरसाट पुढे म्हणाले, “आता बालाजी कल्याणकर हे शिंदे साहेबांचे खूप जवळचे झाले आहेत. त्यावेळचा तो प्रसंग आठवला की हसू येते, पण तेव्हा मात्र आम्हाला घाम फुटला होता!” हा किस्सा सांगताच आमदारांनी टाळ्या आणि हशा यांचा मारा केला.
हा प्रसंग महाराष्ट्राच्या राजकारणातील त्या काळातील तणाव, भीती आणि निष्ठेची झलक देतो. गुवाहाटीतील ते दिवस आता इतिहास झाले असले, तरी असे किस्से राजकीय पटलावर कायम चर्चेचे विषय राहतील.





